“साईवर्धन ” ची ” नवोदय ” कागल साठी निवड : तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
बांबवडे : एकीकडे जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाचा बोलबाला होत असताना, मराठी माध्यमेही तितकीच सक्षम आहेत, हे पुराव्यानिशी सिद्ध करणारे गुरुजन आजही जिल्हापरिषदेच्या ,तसेच इतर मराठी शाळेत ज्ञानदानाचे काम सचोटीने करताहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बांबवडे येथील साईवर्धन विक्रम आंबर्डेकर या महात्मा गांधी विद्यालय बांबवडे इथं पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय कागल इथं निवड झाली आहे. तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत झळकला आहे.
केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय ची परीक्षा स्कॉलरशिप परिक्षेसारखी घेतली जाते. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण नवोदय च्या वतीने १० वी पर्यंत मोफत केले जाते. हि शाळा निवासी असून केंद्रीय स्तरावरील अभ्यासानुसार सुरु आहे.
साईवर्धन विक्रम आंबर्डेकर हा विद्यार्थी बांबवडे विद्यामंदिर इथं ४ थी पर्यंत शिकत होता. पाचवीसाठी त्याने महात्मा गांधी विद्यालय बांबवडे,तालुका शाहुवाडी इथं प्रवेश घेतला. त्याचे पालक देखील पूर्वी इंग्रजी माध्यमांच्या भूलभुलैयाला बळी पडले होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलगा टाय,बूट घालून जायला लागला कि, डोळ्यांचं पारणं फिटतं. परंतु याच शाळा पुढे बंद पडल्यावर करायचे काय? या प्रश्नावर उत्तर नसायचे. पण विद्यार्थ्यामध्ये क्षमता असली, किंवा ती गुरुजनांनी निर्माण केली, तर हाच विद्यार्थी मराठी माध्यमातून सुद्धा आपल्या मराठी आई-वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय रहात नाही, हे साईवर्धन ह्या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. आज सर्वच क्षेत्रांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यासाठी त्याला विद्यामंदिर साळशी चे विक्रम पाटील सर, तसेच बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाचे श्री एस.पी. पाटील सर यांच्यासोबत विद्यामंदिर बांबवडे व महात्मा गांधी विद्यालय बांबवडे च्या शिक्षकवृंदा चे मार्गदर्शन लाभले.
साईवर्धन चे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव त्याच्यावर होत आहे.