…करेल का धाडंस वाकड्या नजरेनं पाहण्याचं ?
जिथं माणुसकीची लक्तरं वेशीवर टांगली गेली, त्या घटनेला आज वर्षपूर्ती होत आहे. शासनाने कारवाई केली, आरोपींना अटक झाली, इथपर्यंत ठीक आहे. परंतु अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाय योजना काही झाली आहे का ? या प्रश्नाच उत्तर माहित नाही,असंच येईल. दरम्यान निदान या आरोपींना तेवढी कठोर शिक्षा होईल का? कि, जेणेकरून अशा आरोपींवर जरब बसेल ? याचं उत्तरही अद्याप सांगू शकत नाही, असंच येईल. या घटनेवरून अखंड मराठा समाजासाहित इतर समाज देखील एकत्र आला, आणि अशा घटनेचा तीव्र निषेध झाला, हि एकच समाधानाची बाब आहे.
परंतु या सामाजिक बांधिलकीसाठी शासनाची ठोस पावलं मात्र कधीच दिसली नाहीत, आजही विनयभंग ,बलात्काराच्या घटना घडतच आहेत. यासाठी शासन आणि न्यायव्यवस्था यांनी आपली कडक न्याय यंत्रणा अजून सक्षम आहे,याचा दाखला देणारा निर्णय आज वर्षपूर्तीच्या अनुषंगाने अपेक्षित आहे.
एका चिमुरडीचा आत्मा आजही आक्रोश करीत असेल, आजही त्या वेदनांचे पडसाद संवेदनशील माणसांना ऐकावयास येत असतील, याबाबत शंका नाही. म्हणूनच मराठा समाजाने उचललेला हा मुद्दा सामाजिक बांधिलकीचा आहे. पण त्याबरोबरच उपाययोजनेचा असावा,अशी अपेक्षा आहे. आज मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, काळाची गरज होवू लागली आहे, जुडो-कराटे, लाठी-काठी अशा प्रकारची प्रशिक्षणे मुलींना, या सामाजिक संघटनानी देणे, हीच खरी उपाययोजना असू शकेल. मुलींसाठी व्यायामशाळा उभी करणे, हि देखील तितकीच गरजेची बाब होवू लागली आहे. ती व्यायामशाळा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी नसेल, तर ती मुलींच्या संरक्षणासाठी असेल. यासाठी सामाजिक संघटनांनी पावले उचलणे गरजेचे आहे, त्याला लोकप्रतिनिधींनी निधी पुरवून पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे.ज्यामुळे भविष्यात ‘ कोपर्डी ‘ सारखी घटना घडताना, घडवणाऱ्यालाही शंभर वेळा विचार करावा लागेल. कारण मुलगी च सक्षम झाली, तर असल्या नराधमांचं काय धाडंस कि,वाकड्या नजरेने मुलींकडे पाहण्याचं. आणि जर पाहिलं तर त्याच उत्तर द्यायला मुलगी च सक्षम होईल. तेंव्हा आपल्या मुली शारीरक दृष्ट्या आणि प्रशिक्षणाद्वारे तयार झाल्या,तर भविष्यात कोपर्डी प्रकरण घडणार नाही,अशी खात्री वाटते,आणि हीच खरी त्या चिमुकलीला वाहिलेली श्रधांजली ठरेल.
आमच्या ‘साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स ‘ आणि ‘एसपीएस न्यूज ‘ च्या वतीने त्या कोवळ्या कळीला मनापासून भावपूर्ण श्रधांजली….