मांगले त अनैतिक संबंधांच्या संशयावरून कोयत्याने मारहाण-आरोपीस अटक
शिराळा : मांगले तालुका शिराळा येथील गणेशनगर मध्ये रहात असलेल्या सुरेश आनंदराव पाटील ( वय ४२ वर्षे ) याच्यावर, आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून, संतोष भगवान चरापले ( वय ३७ वर्षे )याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे, सदरच्या घटनेची फिर्याद सुरेश पाटील याने शिराळा पोलीस ठाण्यात केली आहे. संतोष चरापले यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,दि.१३ जुलै रोजी सकाळी साडे नाऊ वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक सुरेश पाटील हे कामानिमित्त आपल्या वॅगनआर चारचाकी वहान क्र.एम.एच.१० सिए-००६८ ने गणेशनगर मधून शिराळ्याकडे निघाले होते. दरम्यान संतोष याने धोंडीराम गायकवाड यांच्या घरासमोर सुरेश याच्या गाडीसमोर आपली मोटरसायकल आडवी पाडून सुरेश ची गाडी थांबवली. त्यावेळी संतोष ने सुरेश याला तुझे माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध आहेत,त्यामुळे दीड महिन्यापासून माझी पत्नी कुठे आहे ते सांग ,असे म्हणत शिवीगाळ करत त्यास मारहाण केली. दोन्ही हात,पाय व पोटावर कोयत्याने वार करून सुरेशला गंभीर जखमी केले. त्यांनंतर तो त्या ठिकाणाहून निघून गेला. या घटनेची माहिती सुरेशची पत्नी उषा हिला समजताच ती घटनास्थळी आली,आणि मदतीसाठी लोकांना हाक दिली. त्यावेळी शेजारील लोकांनी सुरेश च्याच गाडीतून सुरेशला वारणानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत.