२० जुलै पासून ‘अंनिस ‘ चे ‘जवाब दो ‘ आंदोलन
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० जुलै ला चार वर्षे पूर्ण होत असतानाही, अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पोलीस यंत्रणा अटक करू शकलेली नाही. याच्या निषेधार्थ ‘ अंनिस ‘ च्यावतीने २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘ जवाब दो ‘ आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती ‘अंनिस ‘ चे राज्य-कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दि.१५ जुलै रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना तसेच त्यांच्या हत्त्येशी संबंधित संघटनांवर देखील कारवाई अद्याप केलेली नाही, पोलीस यंत्रणा सक्षम असूनही, केवळ राजकीय इच्छा शक्ती नसल्याने याबाबत कारवाई होत नाही, म्हणून ‘अंनिस ‘ चे ‘जवाब दो ‘ आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना भेटून निवेदन देण्यात येईल,असेही अविनाश पाटील यांनी सांगितले.