कुंभी नदीपात्रात दाम्पत्य बेपत्ता
पन्हाळा : कळे तालुका पन्हाळा येथील ,कुंभी नदीच्या पत्रात पनुत्रे तालुका पन्हाळा येथील दाम्पत्य बेपत्ता झाले असून,५ वर्षाची उत्कर्षा त्यांची मुलगी ही बंधाऱ्याजवळ रडत असलेली लोकांना सापडली .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि,आपली ५ वर्षांची मुलगी उत्कर्षा आजारी असल्याने तिला कळे येथील रुग्णालयात घेवून जातो,असे सांगून श्रीकांत धोंडी कांबळे वय ३९ वर्षे व त्यांची पत्नी लता हे दाम्पत्य घरातून बाहेर पडले. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्र.एम एच ०९-ए एफ-६६०४ वरून बाहेर पडले होते. याच दरम्यान कुंभी नदीवरील गोठे बंधाऱ्यावर पाच वर्षांची मुलगी रडत असताना ,बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना आढळली. त्यांनी चौकशी केली असता आई-वडिलांनी नदीत उडी मारल्याचे समजले. याबाबत तत्काळ पोलीस पाटलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर घटनास्थळी कळे पोलिसपथक दाखल झाले. त्यांनी श्रीकांत कांबळे यांच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. घाबरलेल्या मुलीला त्यांच्या हवाली केले.
पाण्यात पडलेल्या श्रीकांत कांबळे दाम्पत्याचा अद्याप शोध सुरु आहे. श्रीकांत हे शेती करीत असून १४ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगा दोन मुली आहेत. तृप्ती ( वय १३ वर्षे), उत्कर्ष (वय७ वर्षे), तर उत्कर्षा (वय ५वर्षे ) असे आहे. लता यांचे माहेर आकुर्डे आहे. तर श्रीकांतला एक बहिण आहे. अधिक तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई करीत आहेत.