महिलांचा वापर केवळ राजकारणासाठीच- अॅड. माधवी नाईक
शिराळा प्रतिनिधी : प्रत्येक निवडणुकीतील परिवर्तनात महिलांचा सहभाग मोठा असतो, महिला बचत गटांचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातो.त्यांच्या हिताची अंमलबजावणी हि केवळ कागदावरच रहाते, असे मत प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी केले.
शिराळा येथील साई संस्कृती सभागृहात आयोजित महिलांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक पुढे म्हणाल्या कि, केंद्रात व राज्यात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकीत महिलांनी ६५ % मतदान केले आहे. त्यामुळे झालेल्या या सत्ता परिवर्तनात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. या राबणाऱ्या महिलांसाठीच भाजप शासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. भाजप ने निवडणुकीत केलेल्या प्रत्येक घोषणांची अंमलबजावणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा भाजप प्रशासनाने प्रयत्न केला आहे. आरोग्य परिचारिका, आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका यांच्या असणाऱ्या विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली जाईल.
यावेळी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले कि, यापुढील ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांनी डोळसपणे मतदान करावे. अनेक ठिकाणी महिला आरक्षण असून, त्याठिकाणी काम करणाऱ्या महिलांना संधी द्या. अनेक ठिकाणी पुरुषांचे आरक्षण असूनही त्यावर तुमचाही अधिकार आहे. तुम्ही एकदिलाने काम करून परिवर्तन घडवू शकता.
यावेळी रणधीर नाईक म्हणले कि,गाव तिथे महिला शाखा सुरु करून त्या माध्यमातून गावचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वयंसहायीता च्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचे काम सुरु आहे.
यावेळी नगरसेविका अॅड. नेहा सूर्यवंशी, भारती दिंगडे यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
स्वागत व प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. यावेळी उदयसिंहराव नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, प्रल्हाद पाटील, आनंदराव पाटील , उत्तम डांगे,वैभव गायकवाड, सीमा कदम, राजश्री यादव, वैभवी कुलकर्णी, मंजुताई वैष्णवी उपस्थित होत्या. आभार नेहा सूर्यवंशी यांनी मानले.