कोडोली मध्ये आढळले ‘स्वाईन फ्लू ‘ चे पाच रुग्ण
कोडोली प्रतिनिधी :
कोडोली ता.पन्हाळा येथे स्वाइन फ्लू चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. ते सर्व एकाच कुटुंबातील असून, यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे, तर अन्य एकजण संशयित आहे. जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत अधिक दक्षता घेतली असून, रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कोडोली मधील वैभवनगर येथील गोसावी कुटुंबियांत चार जणांना स्वाइन फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विकास विजय गोसावी (वय २०वर्षे ), पवन अविनाश गोसावी (वय ६वर्षे ), वैष्णवी आकाश गोसावी (वय १ वर्षे ६ महिने), आणि ७ महिन्याचा वीर विकास गोसावी या एकाच कुटुंबातील ४ जणांना तापाचा आजार होता. त्यांना कोडोलीच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता,त्यांनी या चारही जणांची स्वाइन फ्लू ची तपासणी केली. बुधवारी त्या बाबतचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्या बाबतचे अहवाल कोडोलीच्या उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध झालेत. त्यामध्ये हे ४ जण पॉझीटीव्ह आढळलेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याबाबत कोडोलीच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ.एस.बी.पाटील यांनी केले आहे.
कोडोलीत स्वाइन फ्लू चे ४ रुग्ण आढळले असून, तसेच अन्य एकजण संशयित आहे. याची हि तपासणी सुरु आहे. या प्रकारामूळे कोडोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक , एल.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य विभागाने विशेष दक्षता ठेवली आहे. आज कोडोली मध्ये पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण सभापती विशांत महापूरे , कोडोलीचे उपसरपंच निखिल पाटील, आदींनी रुग्णाच्या घरी तसेच उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कवटेकर, कोडोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.आर.शेट्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.पाटील, डॉ.नूतन टकेकर, बालरोग्य तज्ञ डॉ.धनंजय पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच स्वाइन फ्लू बाबत मार्गदर्शन करण्यासाठी गनिमी कावा ग्रुप,आणि श्री गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल हुजरे व कार्यकर्ते समाज प्रबोधन करत आहेत.