पावले वाडीच्या खिंडीत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडले
शिराळा प्रतिनिधी : पावलेवाडी (ता.शिराळा) येथील खिंडीमध्ये चाळीस वर्षीय पुरुष जातीचे अनोळखी प्रेत संशयास्पद स्थितीत आढळून आले आहे .
या बाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, की , आज रविवार (ता.३०)रोजी सायंकाळी ६:३० च्या दरम्यान शिराळा – चांदोली रस्त्यावरील पावलेवाडी हद्दीतील खिंडी मध्ये चाळीस वर्षीय पुरुष जातीचे प्रेत आढळून आले. अंगात फिकट तपकिरी रंगाची पॅन्ट, पांढरा व जांभळ्या रंगाच्या लायनिंगचा शर्ट आहे. त्याच्या पायावर , पाठीवर जखमेच्या खुणा आहेत.
शिराळा ग्रामीण रुग्णालयात डॉ. दिनकर कांबळे यांनीं शव विच्छेदन केले असून, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सदरचे प्रेत इस्लामपूर येथील उप जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात दोन दिवस ठेवण्यात येणार आहे. या घटनेची वर्दी पोलीस पाटील अशोक पाटील यांनी शिराळा पोलिसांत दिली असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप वाईकर हे करीत आहेत .