माणुसकीच्या भिंतीद्वारे ‘ सुरभी हेल्थ झोन ‘ ची ‘माणुसकी ‘
पैजारवाडी प्रतिनिधी :
माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमा अंतर्गत ‘ सुरभी हेल्थ झोन ग्रुप ‘ कोडोली यांच्या वतीने विद्यामंदिर बोरपाडळे येथील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कोडोली येथे माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आला .
अल्पावधीतच या उपक्रमास कोडोली परिसरातील लोकांनी वेगवेगळ्या वस्तू दान करून मोठा प्रतिसादही दिला आहे.
या माणुसकीच्या भिंती जवळ हजारोच्या संख्येने शालेय उपयोगी वस्तूसुद्धा जमा झाल्या. यामध्ये प्रामुख्याने वह्या, पुस्तक, पेन पाट्या, कंपास, पेन्सिल ,इ वस्तूचा समावेश आहे. जमा झालेल्या शालेय वस्तू प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या अनाथ, मागास, अपंग व गरीब अशा गरजू विद्यार्थ्यांच्या पर्यत पोहचवण्याचे काम ‘सुरभी हेल्थ झोन ‘ या ग्रुपने हाती घेतले आहे. याच अनुषंगाने विद्यामंदिर बोरपाडळे या प्राथमिक शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना रत्नाकर बँक बोरपाडळे शाखा मॅनेजर सचिन मगदूम व बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष तराळ याच्या हस्ते ५०० वह्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. तराळ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या कोडोली परिसरात फैलावत असलेल्या ‘स्वाइन फ्लू ‘ या रोगाची माहिती दिली. या मध्ये रोग होण्याची कारणे, त्याची लक्षणे , या रोगावरील घरगुती उपाय व वैद्यकीय औषध उपचार अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
यावेळी सुरभी हेल्थ झोन जिमचे संस्थापक संदीप कुंभार, ग्रुपचे सदस्य उदय चौगुले, सरपंच शरद जाधव, अमोल खडके, सतीश कुंभार, शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.