शतकानंतर आज पाहिली,पहिली रम्य पहाट : पिशवीच्या सौ.पाटील मॅडम ना आदर्श शिक्षिका पुरस्कार
बांबवडे : सुमारे शंभर वर्षानंतर पिशवी तालुका शाहुवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला न्याय मिळाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज कोल्हापूर जिल्ह्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ. शोभा शिवाजी पाटील मॅडम ना मिळाला. खऱ्या अर्थाने आनंद झाला. सह्याद्रीच्या कुशीत आणि पिसाई देवीच्या कृपा छत्राखाली गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या पिशवी गावात गुणांची खाण आहे. परंतु दुर्दैवाने नेहमीच सोन्याला कस असतो,या रीतीने गावाला न्याय उशीराच मिळत आला आहे. असो ,
सौ.पाटील मॅडम या पदवीधर अध्यापिका आहेत. शिष्यवृतीसाठी त्यांचे मार्गदर्शन अनमोल आहे. त्या ते नेहमीच करीत आल्या आहेत. अध्यापनाचे काम करत असतानाच अव्याहत वाचनामुळे त्या उत्कृष्ट निवेदिका देखील आहेत. समाजाच्या अनेक अंगांचा अभ्यास असल्याने त्या स्वतंत्र लेखिका देखील आहेत. समाजाच्या विविध अंगांचा जवळून अभ्यास केल्याने त्यांनी लेक वाचवा अभियान आपल्या गावात राबवले. मुलींचे शिक्षण,आणि समाजविकासाचा ध्यास त्यांना अव्याहतपणे आहे. विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. या सगळ्याबरोबर आपली संस्कृती जपण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. महिलांच्या झिम्माफुगडी कार्यक्रमातही त्यांचा मोठा वाटा आहे.
सौ.शोभा शिवाजी पाटील व त्यांचे पती शिवाजीराव पाटील हे दाम्पत्य समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले दिसते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी,यासाठी त्यांनी वाचनालय सुद्धा सुरु केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या घराच्या वास्तुशांती दिवशी देखील पुस्तकांचे वाटप करून मराठी समाज पुढारत आहे, हेच आपल्या कृतीतून या दाम्पत्याने दाखवून दिले आहे.
सौ. शोभा पाटील मॅडम यांचे पुनश्च अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज च्या वतीने खूप खूप शुभेच्छा .