अखेर सरुडात ” बाटली ” आडवी
सरूड : सरूड तालुका शाहुवाडी इथं दारूबंदीसाठी गावातील मतदारांनी मतदान करून अपेक्षेप्रमाणे दारूची बाटली आडवी केली. गावातील एकूण २४३२ महिला मतदारांपैकी १७६८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ठरावाच्या बाजूने १६०३ मते आडव्या बाटलीसाठी, तर उभ्या बाटलीसाठी ९३ मते मिळाली.७२ मते अवैध ठरली.
सरूड बसस्थानक परिसरातील प्राथमिक शाळेतील इमारतीमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा.पर्यंत मतदारांनी मतदान केले.त्यानंतर सहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली . निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी काम पहिले.
या लढ्याचे नेतृत्व गोकुळच्या संचालिका सौ.अनुराधाताई पाटील , सौ. प्राजाक्ता सत्यजित पाटील, सौ.राजकुंवर पाटील, सरपंच सौ. मीना घोलप, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षाअलका भालेकर, माजी सरपंच सौ. सुनिता आपटे, सुगंधा काळे यांच्यासमवेत असंख्य महिलांनी दारूची बाटली आडवी केल्याचा आनंद लुटला. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली.
या मतदान प्रक्रियेत भेडसगाव मंडल अधिकारी अंकुश रानमळे, राजेंद्र माळी, सुधाकर गावित, यांनी मतदान केंद्रप्रमुख म्हणून तर ए.बी.पाटील, रोहिणी पाटील, कपिल म्हैशाळे, एम.एम. जाधव, राजू शिंदे, अरुण भालेकर, या महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात सहकार्य केले. पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी.एच.यम्मेवार, विश्वास चिले, अपराध व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.माजी आमदार बाबासाहेब पाटील ,व आमदार सत्यजित पाटील सरुडकर या पितापुत्रांनी सरूड स्थानक परिसरात दिवसभर ठाण मांडले होते.
दरम्यान तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी मतदान केंद्रावर भेट देवून कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर सरुडकरांनी हा दारूबंदीसाठी केलेला लढा यशस्वी केला.