कोडोली पोलिसांनी गणेश मंडळांच्या सहाय्याने दहा गांवे केली सीसीटीव्ही युक्त

कोडोली प्रतिनिधी :
गणेश तरुण मंडळाच्या माध्यमातून जमा केलेल्या चार लाख रुपये निधीतून कोडोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील दहा गावात सीसीटीव्ही प्रकल्प तसेच इतर गावात मंदिर, शैक्षणिक व इतर सामाजिक असे उपक्रम कोडोली पोलिसांनी राबविेल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यानी दिली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर.आर.पाटील यांनी सर्वच गणेश मंडळांना गणेश उत्सवात जमा झालेल्या निधीतील काही रक्कम सर्वच मंडळांनी एकत्रित करून आपआपल्या गावातील विधायक विकास कामाला हातभार लावावा, असे आवाहन केले होते. पोलीस दलाच्या या आवाहनाला कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांनी चांगलाच प्रतिसाद दिला. गावातील विकासकामांसाठी निधी संकलित करण्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी फौजदार संदीप बोरकर, शाम देवणे यांच्या अधिपत्याखाली सहायक फौजदार सीताराम डोईफोडे, विट्टल बहिरम हवालदार संभाजी पाटील, नामदेव सुतार, एम. एल. पाटील यांच्या माध्यमातून गावातील एक समन्वयक कार्यकर्ता व पोलीस पाटील यांच्या संयुक्त पथकाद्वारे हा निधी संकलित करण्यात आला असल्याचे, जाधव यांनी सांगितले.
कोडोली पोलिस ठाण्याच्या कक्षेतील बच्चे सावर्डे, मोहरे, काखे, आरळे, शहापूर, बोरपाडळे, माले, जाफळे, वाडी रत्नागिरी, जाखले या दहा गावात एकांवन्न सीसीटीव्ही कॅमेरे प्रमुख ठिकाणी बसवण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे. बच्चे सावर्डे येथे गणेशोत्सव काळातच या सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे. लवकरच इतर गावातही सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण करणेत येणार आहे.
केखले गावात ग्रामदैवत श्री हनुमानाच्या सुरु असलेल्या जीर्णोद्धारातील कळसाच्या कामास पन्नास हजार रुपये, सातवेतील श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणातील कट्ट्यावरील फ्लोरिंग कामासाठी अदांजे चाळीस हजार रुपयांची मदत गणेश मंडळांनी केली आहे.
मालेतील लकी ग्रुपच्यावतीने अंगणवाडीतील बालकांचे बौद्धिक कौशल्य विकासाकरता लागणाऱ्या साहित्याचा खर्च, शिवाजी पेठ तरुण मंडळाने अनाथ मुलांकरिता वह्या पुस्तके वाटप, तसेच गावातील लोकांकडून जुनी कपडे व खेळणी जमा करून ती माऊली ट्रस्ट कडील अनाथ मुलांना दिली. गिरोली येथील अजिंक्य तरुण मंडळ, ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, ज्योतिर्लिंग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या तीन मंडळांनी प्राथमिक शाळेजवळील विहिरीत विद्यार्थी पडून दुर्घटना घडू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी संकलित केला आहे. पोहाळे तर्फ आळते येथील शाहू तरुण मंडळांने गावातील तीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतले आहे.
पोखले येथील जय शिवराय तरुण मंडळाने बालक व विद्यार्थ्या करता शाळेत राबवण्यात येणारे सांस्कृतिक कौशल्य विकास कार्यक्रमाकरिता पंधरा हजार रुपये किमतीचे वाद्यवृंद साहित्य दिले आहे.आरळे येथील शिवशक्ती तरुण मंडळाने रक्तदान शिबीर घेण्याबरोबरच वयोवृद्ध नागरिकांसाठी नेत्रतपासणी शिबिर भरवून, त्यांना नंबर प्रमाणे मोफत चष्मे वाटप व संघर्ष ग्रुपच्यावतीने शंभर रोपांचे वृक्षारोपण केले आहे असे जाधव यांनी सांगितले.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!