कोडोलीमध्ये विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
कोडोली प्रतिनिधी :
कोडोली ता.पन्हाळा येथील जळण गोळा करण्यासाठी गेलेले श्रीपती आनंदा गायकवाड वय ९० वर्षे यांचा गावंदर मळा येथील पाटील विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी ; कोडोली येथील बेथलनगर येथे रहाणारे श्रीपती आनंदा गायकवाड हे आज शनिवार दिनांक १६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान जळण गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोडोली मधील गावंदर मळा येथील पाटील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचे विहीर मालक तुफान पाटील यांनी पाहिले. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून, नातू व विवाहित मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.