बोरपाडळे फाटा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोको आंदोलन
कोडोली प्रतिनिधी :
बोरपाडळे ( ता.पन्हाळा ) हॉटेल येथे आज बुधवार दिनांक २० रोजी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आज दुपारी ‘ रास्ता रोकॊ ‘ आंदोलन करण्यात आले. आर. टी. ओ. कार्यालयाकडून वाहन पासिंग दरम्यान घालण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, तसेच इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या विमा प्रिमियम मध्ये दरवर्षी वारेमाप वाढ करतात. यावर अंकुश बसावा, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन साधारणपणे २० ते २५ मिनिटे चालले. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना मुक्त केले.
कोडोली ता.पन्हाळा आणि परिसरात तीन चाकी आणि चार चाकी वाहनातुन वडाप चालते. प्रवाशांकडे उपलब्ध असलेली खाजगी वाहने आणि व्यवसायामध्ये वाढलेली स्पर्धा, त्यात भरीत भर म्हणून दररोज वाढणारे इंधनाचे भाव, अशामुळे वडाप व्यवसाय परवडेनासा झाला आहे. अशातच आर. टी. ओ. कार्यालयात वाहन पासिंग दरम्यान जाचक अटी लावल्या जातात. अनेक वेळा वाहने रद्द केली जातात. त्यामुळे वडाप व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तसेच विविध विमा कंपन्या वाहनांच्या प्रिमियममध्ये, दर वर्षी वारेमाप वाढ करत आहेत.यासर्व बाबी वडाप व्यवसायिकाना न परवडणाऱ्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने बोरपाडळे हॉटेल येथे रास्ता रॊको आंदोलन करण्यात आले. साधारणपणे २० ते २५ मिनिटे चाललेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू जाधव, उपजिल्हा अध्यक्षा श्रद्धा महागावकर , विनायक पाटील, नयन गायकवाड ,सुरज निकम, फिरोज मुल्ला , राजू मुल्ला, आदी उपस्थित होते, या सर्व आंदोलकांना पोलिसांनी प्रथम कारवाईचा भाग म्हणून ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.