जोतिबा मंदिरात घटस्थापना : श्री जोतिबा देवाची नागवल्ली पानांमध्ये बैठी पूजा
कोडोली प्रतिनिधी:-
आज पासून शारदेय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रती वर्षी घरोघरी घटस्थापना करून, या उत्सवाला सुरुवात करण्यात येत असते. दख्खन चा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात ही आज घटस्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पुजाऱ्यांच्या हस्ते हि घट स्थापना करण्यात आली आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीचा जोतिबाचा जागर ७ व्या माळेला म्हणजेच बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी आहे. नवरात्र उत्सवा दरम्यान देवाला तेल वाहण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात.
अवघ्या महाराष्ट्राप्रमाणे वाडी रत्नागिरी ,जोतिबा मंदिर येथे आज पासून शारदेय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापने निमित्त आज मंदिर पहाटे ३ वाजता उघडण्यात आले. पाद्यपूजा आणि काकड आरती करून, देवाला पहाटे ५ वाजता अभिषेक घालण्यात आला. ६ वाजता महापूजा करण्यात आली. आज देवाची नागवेल्ली पानात बैठी पूजा बांधण्यात आली आहे. ९ वाजता धूप आरती करून जोतिबा मंदिरा बरोबरच यमाई, चोपडाई, तसेच इतरही मंदिरात घटस्थापना करण्यात आली. जोतिबाची धूप आरती दुपारी १२ वाजता करण्यात आली. नवरात्रीच्या काळात भाविक देवाला तेल आणि कडाकण्या वाहण्यासाठी मंदिरात गर्दी करतात.या उत्सवा दरम्यान मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.