शेतकऱ्यांनो भात नाही ,तर तांदूळ विका-खासदार राजू शेट्टी
बांबवडे : शेतकऱ्याच्या भाताला किमान १५५०/-रु. दर मिळाला पाहिजे, यापेक्षा कमी दर चालणार नाही. यासाठी शासनाने भात खरेदी केंद्रे सुरु करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनो भात नाही तर तांदूळ विक्री करा. असे मत प्रतिपादन स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. बांबवडे तालुका शाहुवाडी इथं स्वाभिमानी पक्षाच्या वतीने भात परिषद घेण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.शेट्टी बोलत होते.
बांबवडे येथील जनावरांचा बाजार इथं, हि भात परिषद आयोजित केली होती. यावेळी शाहुवाडी ,पन्हाळा, शिराळा तालुक्यातून शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.यावेळी तालुकाध्यक्ष वसंत पाटील ओकोलीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सर्वप्रथम खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना शेट्टी पुढे म्हणाले कि, आपला शेतकरी अडचणीत येतोय, कारण आपण काही किरकोळ कामांसाठी व्यापाऱ्यांवर विसंबून राहतो. शेतकऱ्याने भात न विकता त्याचे तांदूळ करून विकावे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येवून वाहन ठरवावे जेणेकरून वाहतुकीचा खर्च विभागल्यामुळे कमी होईल. भाताचा कोंडा आपल्याला मिळाल्यामुळे त्याची किमत वजा करता येते. आणि एकदाच पॉलीश केलेला तांदूळ विकल्यामुळे त्याला दरही जादा मिळेल. शेतकऱ्याने आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून ते विक्री करण्याचे तंत्र अवलंबिले पाहिजे. तसेच उत्पादक ते थेट ग्राहक असे धोरण राबवले, तर त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्याला होईल.
यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांचा, आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले कि,सीता म्हणजे भूमिकन्या, तिला शोधायला गेलेले हनुमान तिथेच राहिले,कारण सत्तासुंदरीचा मोह त्यांना सोडवेना. परंतु आम्ही इमानदार आहोत, म्हणून सत्तेवर लाथ मारून परत आलोय. स्वाभिमानी हि बाजार बुनग्यांची फौज नाही. अशा अनेक टिपण्या त्यांनी यावेळी केल्या. तसेच आम्हाला जगाच्या स्पर्धेत उतरायचे आहे. यासाठी निर्यातीवरचा कर उठवला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपला एक मुलगा संघटनेला वर्गणी म्हणून द्या. मग पाहू कसा न्याय मिळत नाही ते. असे आवाहन हि श्री तुपकर यांनी केले.
यावेळी श्रीकांत तावरे, भगवान काटे, जालिंदर पाटील, शिरोळ पंचायत समिती च्या माजी सभापती सौ अपराध , विक्रम तिरपनकर, आदींनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी शाहुवाडी तालुका स्वाभिमानी संघटनेच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमास युवा आघाडी अध्यक्ष सागर शंभू शेटे, अवधूत जानकर, गुरुनाथ पाटील, सुनील पाटील, अजित साळोखे, पद्मसिंह पाटील, तुकाराम खुटाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश म्हाऊटकर यांनी केले.