केखले येथे अंगावर भिंत कोसळून वृद्धाचा मृत्यू
कोडोली वार्ताहर:
केखले ता.पन्हाळा येथील मातंग वसाहत येथे घराची भिंत कोसळून, बाजीराव बापू संकटे वय ५८ वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पत्नी बाळाबाई संकटे ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
केखले येथील मातंग वसाहत येथे रविवार दिनांक १ रोजी रात्रीं २ वाजण्याचा सुमारास बाजीराव संकटे आणि त्यांच्या पत्नी बाळाबाई संकटे हे झोपेत असताना, शेजारील घराची भिंत अचानक संकटे यांच्या भिंतीवर कोसळले. बाजीराव संकटे यांच्या घराची भिंत मातीपासून बांधली असल्याने, ती झोपेत असलेल्या संकटे यांच्यावर पडली. शेजारीच राहणारा त्यांच्या मुलाला हे समजताच, त्याने शेजारांच्या मदतीने बाजीराव संकटे आणि बाळाबाई संकटे यांना मातीच्या ढिगाऱ्याखालुंन बाहेर काढून, उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये नेण्यात आले. पण डॉक्टरांनी.संकटे यांना मृत घोषित केले. तर बाळाबाई ह्या गंभीर जखमी असल्याने, त्यांना कोल्हापुर येथील प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून,कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.