‘ खराटा ‘ व ‘ टमरेल ‘ मुळे शिराळा तालुक्याची चित्रपट क्षेत्रात वेगळी ओळख
शिराळा,ता.३: स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधन करणाऱ्या ‘ खराटा ‘ व ‘ टमरेल ‘ या लघुचित्रपटाने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवून, शिराळा तालुक्याची चित्रपट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे प्रबोधनात्मक चित्रपट शिराळा नगरपंचायतीच्यावतीने वेगवेगळ्या प्रभागात दाखवले जातील, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी केले.
नगरपंचायत येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आणि ‘ खराटा ‘ व ‘ टमरेल ‘ या लघुचित्रपटाच्या प्रदर्शन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकाचे सदस्य व अभिनेते रंगराव घागरे होते.
प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोनटक्के म्हणाल्या, आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा आहे.प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिले तर गल्ली, गाव, तालुका, जिल्हा स्वच्छतेच्या अग्रेसर होत जाईल. हाच धागा पकडून शिवाजीराव चौगुले व त्यांच्या टीमने ‘ खराटा ‘ व ‘ टमरेल ‘ या लघुचित्रपटाची निर्मिती करून, चांगला स्वच्छतेचा संदेश दिला आहे. हाच संदेश शिराळा शहरात पोहचवण्याचा आम्ही नगरपंचायत मार्फत प्रयत्न करू.
रंगराव घागरे म्हणाले, चित्रपट सृष्टीत ग्रामीण भागातील कलाकार पुढे येऊ लागले असून, त्यांना आत्ता चांगला वाव मिळत आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील कलाकारांनी घ्यावा.
यावेळी मुख्याध्यापक सर्जेराव टाकले, दिग्दर्शक शिवाजीराव चौगुले, नगरसेवक मोहन जिरंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, नगरसेवक विजय दळवी, मोहन जिरंगे, नगरसेविका राजश्री यादव, सर्जेराव टाकले, राजेंद्र टिळे, महादेव पाटील, दत्तात्रय पाटील, प्रितम निकम, सुधीर मगदूम, अधीक्षक सुभाष इंगवले, सदानंद टिळे, विजय शिंदे, लक्ष्मण मलमे, अली मुंडे, प्रीती पाटील, सागर दाभाडे, संतोष कांबळे, रमेश जाधव, अविनाश दाभाडे उपस्थित होते. काजल शिंदे यांनी आभार मानले.