बांबवडे तील ‘गणेशनगर ‘ मधील मतदार मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं, एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडत असताना, प्रचाराची यंत्रणा शेवटच्या टप्प्यात येत असताना, दुसरीकडे मात्र गावच्या काही असुविधांमुळे प्रभाग क्रमांक १,२, आणि ४ मधील मतदार मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. या प्रभागांमध्ये पाणी, रस्ता, विजेचे खांब या प्रश्नांबाबत ग्रामपंचायत उदासीन असलेने येथील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे, निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
याबाबत निवेदनात नमूद केले आहे कि, ग्रामपंचायतीने आमच्या प्रभागांमध्ये गेल्या पाच वर्षात रस्ते का केले नाहीत?, तसेच पाणी जाण्यासाठी गटारांची सुविधा का केली नाही? आमही ग्रामपंचायत चा महसूल भरत असूनही, हा दुजाभाव आमच्या वाट्याला का ?, आमच्या प्रभागांमध्ये पाणी नेहमीच गढूळ येत असते, तसेच इथं नेहमीच दुषित पाणी पुरवठा केला जात असतो, असे का ?, येथील विजेचे खांब खराब झाले असून हि ते बदलले का नाहीत ?
दरम्यान रस्ते, पाणी, वीज हे नागरिकांचे मुलभूत हक्क असूनही, या तीन प्रभागातील जनता आपल्या मुलभूत हक्कांना मुकली आहे. जो पर्यंत आमच्या मागणीचा पुरवठा होत नाही, तोपर्यंत आम्ही या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहोत. अशा आशयाचे निवेदन, येथील ग्रामस्थांनी प्रसिद्धीला दिले आहे. या निवेदनावर ३० मतदारांच्या सह्या आहेत.
विशाल सुदाम साठे, रा.ज. शित्तुरकर, शामराव कारंडे, प्रभाकर रेवणकर, रामचंद्र लोहार, बबन नलावडे, बाजीराव परीट, वी. कोकणे सर, नियाज मणेर, सनी दिंडे आदी ३० नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत.