गांव तसं चांगलं…
एका वृद्ध ग्रामस्थाच्या निधनाने समाजकारणावर राजकारणाने केलेली मात उघडकीस आली. नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपल्या आहेत. राग,लोभ अजूनही लोकांच्या मनात असल्याचे दिसून आले. राजकारणा हे समाजकारणाच्या पोटी जन्मलेलं अपत्य आहे. तेंव्हा राजकारणापेक्षा समाजकारणाला च अधिक महत्व आहे. कोणे एकेकाळी राजकारणाने कहर केला होता. परंतु गेल्या दशकात समाजाने आपल्याला आलेली प्रगल्भता आपल्या वागण्यातून दाखवून दिली.
एकेकाळी राजकारणापायी भावाभावांची डोकी फुटायची,आणि ज्यांच्यासाठी हे राजकारण केलं जायचं, ती मंडळी मात्र आपले सगे सोयरे आप्तेष्ट घेवून एकसंघ रहायचे. यानंतर समाजाचे डोळे उघडले, आणि राजकारण ठराविक मर्यादेपर्यंत राहू लागले,आणि समाजकारणाने गती घेतली. त्याअगोदर एका राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्याने, दुसऱ्या राजकीय पार्टीच्या कोणत्याही सुखदु:खात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला जात असे. त्यामुळे अंत्यविधी, लग्नसोहळा या सामाजिक घटनांमध्ये देखील राजकीय पार्ट्या दिसू लागल्या. परंतु काही काळानंतर समाज भानावर आला. आणि या प्रथा मोडीत निघाल्या. राजकारण ठराविक मर्यादेपर्यंतच राहिले. त्याला समाजकारणाच्या उंबरठ्याच्या आत न घेण्याचा स्तुत्य निर्णय समाजानेच घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने समाज एकत्र झाला, आणि समाजाची प्रगती जोमाने सुरु झाली. लोकांच्यातील प्रगल्भता वाढली. प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होवू लागला .आणि खऱ्या अर्थाने समाज एकत्र झाला. म्हणतात ना, ” गाव करील ते राव काय करील “. हे समजाच्या एकसंघ पणाचे उत्कृष्ट उदाहरण होते.
परंतु या सामाजिक भावनेला पुन्हा एकदा तिलांजली मिळते कि काय, याची पुनश्च भीती वाटू लागली. एकेकाळी गावचे भेंडे म्हणून गणले जाणारे, कुटुंब आज फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राजकारणातील जय, पराजय हा केवळ क्षणिक भाग असतो , राजकारण कुणीही केले तरी, समाजकारण मात्र आपल्यालांच करायचे असते. कारण आपण समाजातील महत्वाचे घटक आहोत. उगाच कुणालाही गावचे भेंडे होण्याचा मान मिळत नसतो. परंतु या मानाची ‘आब’ राखणे आपल्याच हाती असते. समाजात हि ” फोडा आणि झोडा ” नीती फार पूर्वी पासून चालत आली आहे. यातून आपण शिकले पाहिजे. आपल्या समाजात फुट पडता कामा नये. राजकारण काहीही घडो ते खिलाडू वृत्तीने स्वीकारले पाहिजे, अन्यथा आपला समाजंच एकमेकांच्या विरोधात उभा राहील, आणि बाहेरच्या हितशत्रूंना आपल्यातील संघर्षाचा फायदा होईल. तेंव्हा या जुनाट रूढी ,परंपरांना फाटा देवून समाजाच्या हितासाठी समाजकारण करू या. कारण समाजकारणाच्या पोटी राजकारणाचा जन्म झाला आहे, राजकारणापोटी समाजकारणाचा नाही.
गाव नेहमीच चांगलं असतं, परंतु काही अनिष्ट रूढी आणि क्रोध यांनी या चांगुलपणावर जर मात केली, तर मात्र समाज बिघडण्यास वेळ लागणार नाही. अराजकता माजेल. प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल, आणि या सगळ्याचा शेवट म्हणजे समाजाचा विध्वंस हाच असेल, याचे आपण ग्रामस्थ मंडळींनी भान ठेवले, तरच खऱ्या अर्थाने समाजकारण टिकेल. सुज्ञास अधिक सांगणे न लागे.