चक्रभैरव मंदिरातील खून झालेली अज्ञात व्यक्ती कुंडल ची ‘ कृष्णात शिंदे ‘

शिराळा प्रतिनिधी : शिरशी ते शिवरवाडी तालुका शिराळा , या दोन्ही गावांच्या हद्दीवरच्या डोंगरावर असणाऱ्या चक्रभैरव मंदिराच्या गाभाऱ्यात खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची चौथ्या दिवशी ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली येथील कृष्णात तुकाराम शिंदे (वय ४७ वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत संशयित म्हणून एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरच्या घटनेमुळे हा खून आहे, कि नरबळी याचा छडा लवकरच लागण्यात मदत होणार आहे. उद्यापर्यंत याचे खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेचा छडा लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरु आहे. सोमवारी सकाळी सांगली चे श्वान पथक घटनास्थळी आणले होते. बल्लू नावाच्या श्वानाला मृत व्यक्तीच्या कपड्यांचा वास देण्यात आला होता, परंतु मंदिराच्या पश्चिमेला व पूर्वेला जवळपास तीस मीटर च्या अंतरावर मंदिराभोवतालीच ते घुटमळले होते.
शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी पुरुष जातीय अज्ञात व्यक्तीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत त्या ठिकाणी देवळाचे काम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दिसले होते. त्यांनी हि माहिती आपल्या मालकाला दिली. देवळाच्या गाभाऱ्यात मृतदेह आढळून आल्याने ,तो खून कि,नरबळी अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तो नरबळी असावा, त्यामुळे त्यादृष्टीने तपास करावा,असे निवेदन पोलिसांना दिले आहे.
रविवारी कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी विश्वास नांगरे-पाटील ,जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तपासासाठी सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली असून, नरबळी आहे कि, नरबळी च्या नावाखाली हा खून करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने तपास सुरु आहे. याबाबत माहिती देणाऱ्याला २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. इतरत्र हि तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली असताना, आज दि .२१ नोव्हेंबर रोजी ती व्यक्ती कुंडल तालुका पलूस येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागतात का, यासाठी यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे.

6+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!