चक्र भैरवनाथ मंदिरातील अनोळखी प्रेताच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना

शिराळा : शिरशी ( ता शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात शनिवार खुन झालेल्या व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही. घटना स्थळी रविवारी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे , अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या असून, तपास यंत्रणा गतिमान झाली आहे. हा खून की नरबळी याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
शिरशी जवळील चक्रोबा डोंगरावर हे मंदिर आहे .या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम २०१३ पासून चालू असून, शनिवारी सकाळी कामगार या मंदिरात आले असता, त्याना हा मृतदेह दिसला होता.या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती जवळ लिंबूला टाचण्या खोवल्या होत्या, तसेच गुलाल, हळद, कुंकू होते. मयत व्यक्ती जवळील प्लास्टिक पिशवीत याच वस्तू होत्या. कपड्यांच्या खिशात पोलीसाना पाचवा मैल ते अंकलखोप या प्रवासाचे एस टी बसचे तिकीट सापडले आहे , मयत व्यक्तीच्या अंगावर नवीन कपडे होते तसेच डोक्याच्या मागील बाजूस दगड , विटा ने मारले असावे, कारण या विटेवर व दगडावर रक्त लागले होते.
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख शिंदे, ,अतिरिक्त जिल्हापोलीस प्रमुख बोराटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे ,सहा पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे , प्रवीण जाधव यांनी पाहणी केली. यावेळी मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय महिंद, निवृत्त पोलिस अधिकारी बापूराव जाधव , सरपंच रुपाली भोसले, शेखर भोसले , मंदिराचे काम करणारे गवंडी आदींच्या कडे चौकशी करून माहिती घेतली. याचबरोबर या मंदिर जीर्णोद्धार चे काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करण्याची सूचना केली.
एस टी बस तिकीट या पुराव्यावरून तीन ते चार ठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे कडे दिला असून नरबळी आहे की नरबळीच्या नावाखाली हा खून करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने तपासाबाबत सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, या घटनेबाबत जो माहिती देईल त्यास रोख २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. असे कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
या घटनेच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, गुंडा विरोधी पथक ,तसेच शिराळा , कोकरूड, इस्लामपूर, कासेगाव पोलीस ठाण्याची चार अशी एकूण सहा पथके मयत व्यक्तीची ओळख व गुन्हेगार शोधासाठी पाठवण्यात आली आहेत.असे उपविभागीय पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!