पत्नीनेच केला पतीचा सुपारी देवून खून
शिराळा : शिरशी ते शिवरवाडी तालुका शिराळा दरम्यान असणाऱ्या चक्रभैरव मंदिरात शनिवार दि.१८ नोव्हेंबर रोजी झालेला खून हा नरबळी नसून कृष्णात तुकाराम शिंदे (वय ४७ वर्षे ) यांची पत्नी उज्वला शिंदे हिने सुपारी देवून केला आहे. अशी माहिती पोलीस उपाधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकारांना दिली.
पती-पत्नी च्या वादातून कृष्णात यांची पत्नी उज्वला हिने अन्य एका व्यक्ती करवी कट रचून खून केला असल्याचे, काबुल केले आहे. शिराळा येथील न्यायालयात तिला हजर केले असता, न्यायालयाने तिला २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
कृष्णात, व त्याची पत्नी उज्वला यांच्यात वारंवार भांडणे होत होती. तो दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करतो, त्यामुळे सप्टेंबर २०१७ पासून उज्वला सासरी कुंडल इथं न रहाता, माहेरी भिलवडी इथं रहात होती. कृष्णात यांच्याजवळ १५ वर्षांची त्यांची मुलगी, तर उज्वला यांच्याकडे ८ वर्षांचा मुलगा रहात होते. शनिवारी सायंकाळी कृष्णात मुलगीला सोडण्यासाठी भिलवडी इथं गेले होते. त्यावेळी सुद्धा त्या पती-पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने भांडण सोडवून , तुमच्या भांडणावर एका देवाचे देणे आहे, ते भागवून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका मंदिरात जावू, पुन्हा तुमचे वाद होणार नाहीत. म्हणून ती व्यक्ती शनिवारी रात्री साडेआठ वाजता कृष्णात यांना घेवून गेली. त्यानंतर रात्री उशिरा शिराळा तालुक्यातील शिरशी येथील चक्रभैरव मंदिरात नेवून त्यांचा खून केला. यावेळी मंदिरात नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू, इतर दैवी उपचार केल्याचे साहित्य ठेवून नरबळी असल्याचे भासवण्यात आले होते. कृष्णात यांच्या पत्नीकडून हि प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी अजून काही गोष्टी पोलिसांना अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे २९ नोव्हेंबर पर्यंत पोलिसांनी ,पोलीस कोठडी मागितली .
घरगुती भांडणातून खून झाला असल्याचे प्रथम दर्शनी जरी पुढे आले असले, तरी रात्री कृष्णात यांना घेवून किती जण गेले होते,कोणत्या वाहनाने गेले होते.,पत्नी बरोबर होती काय, हे प्रश्न अद्यापि अनुत्तरीतच आहेत. पोलिसांचा तपास ह्या सर्व शक्यता गृहीत धरून सुरु आहे. मृतदेहाची ओळख पटणे हेच मुळी मोठे आव्हान होते. ओळख पटल्यामुळे आता तपासाला वेळ लागणार नाही,असे यावेळी पोलीस उप अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंगडे यांनी सांगितले.