शिराळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा मेळावा संपन्न
शिराळा : सध्याच्या केंद्र व राज्य सरकार च्या सर्वच निर्णयामुळे सामान्य जनतेचे, युवकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळे या सर्वांच्यात प्रचंड नाराजी आहे. जीएसटी सारखा कर लावून शासन खुलेआम सावकाराचा व्यवसाय करत असल्याने, या सरकारला आता युवा पिढीच उलथून टाकेल, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे पक्ष निरीक्षक संग्राम सस्ते यांनी केले.
चिखली तालुका शिराळा येथील गणपती मंदिर सभामंडप मध्ये आयोजित तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मानसिंगराव नाईक होते.
यावेळी माजी आमदार नाईक म्हणाले कि, या शासनाने फसव्या घोषणा करून सामान्य जनतेला रस्त्यावर आणले आहे. आता या जनतेच्या प्रश्नासाठी झगडण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. येथील नाकर्ते लोकप्रतीनिधीमुळे तीन वर्षात एक रुपयाचा सुद्धा विकास झाला नाही. युवकांनी येथील गिरजवडे प्रकल्पाचे काम चालू होणे, व वाकुर्डे योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी युवकांनी आंदोलन करावे. येथील युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादी ने घेतली आहे.
यावेळी पक्ष निरीक्षक सस्ते म्हणाले कि, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सात ठिकाणी युवकांच्या विभागीय स्तरावर राज्यात सभा होणार आहेत. त्याच बरोबर ६५ ठिकाणी जिल्हास्तरीय सभा होणार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता यायला कोणी रोखू शकणार नाही. युवकांनी आता जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक आंदोलने करावीत.
याप्रसंगी विराज नाईक म्हणाले ,युवक संघटना ची मजबूत बांधणी करून प्रत्येक समाज, प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी चा विचार पोहोचला पाहिजे. त्यांच्या अडचणी व प्रश्न सोडवता येईल.
यावेळी विजयराव नलवडे, जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख, विशाल घोलप, सुनील तांदळे, यांनी मनोगते व्यक्त केली.
या मेळाव्यास बाळासाहेब पाटील, उपसभापती सम्राटसिंग नाईक, गजानन पाटील, महेश गुरव, हर्षद माने, विजय पाटील, विनायक पाटील, अक्षय कडोले, आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष राहुल पवार यांनी केले. युवराज पाटील यांनी आभार मानले.