नॅशनल कॅडेट कोअर १९ बटालियन च्या वतीने पावनखिंड परिसराची स्वच्छता
मलकापूर प्रतिनिधी : इतिहासाची साक्षीदार असणारी पावनखिंड हि विशेष महत्वपूर्ण आणि मौल्यवान भूमी असून त्यागाच्या बलिदानाने पावन झाली असल्याचे मत, सी.ओ. कमांडिंग ऑफिसर नॅशनल कॅडेट कोअर १९ बटालियन चे कर्नल आनंद भूषण यांनी पावनखिंड येथे व्यक्त केले.
या बटालियन च्या वतीने पावनखिंड विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
१ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ट्रेकिंग चे आयोजन केले आहे. साधारणत: या नॅशनल कॅडेट कोअर मध्ये भारतातील विविध भागातील सुमारे १००० एन.सी.सी. कॅडेट , १० ऑफिसर आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथून या मोहिमेला सुरुवात होवून पन्हाळा, खुटाळवाडी, शाहुवाडी, पांढरेपाणी,व बौध्दवाडी या ठिकाणी कँप आयोजित केले आहेत.
या कालावधीत पावनखिंड विशेष स्वच्छता मोहीम याविषयी बोलताना कर्नल आनंद भूषण पुढे म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने अजरामर ठरलेल्या पावनखिंड येथे स्वच्छता करताना, एक नवी प्रेरणा मिळत आहे. या ठिकाणी विविध ठिकाणाहून पर्यटक येत आहेत, मात्र स्वच्छतेविषयी कुणीही विशेष लक्ष देत नाहीत. या पवित्र भूमीला स्वच्छ ठेवणे, गरजेचे आहे.
नॅशनल कॅडेट कोअर च्या देशातील विविध प्रांतातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि इतिहासाची साक्षीदार असलेल्या पावनखिंड परिसराची स्वच्छता केली. यावेळी स्वच्छता करताना कमांडो ऑफिसर सह सर्व छात्रांच्या मनात एक विलक्षण जिव्हाळा आणि प्रेरणा निर्माण झाल्याचं मत अनेक छात्रांनी व्यक्त केलं.
यावेळी सुभेदार मेजर बी.परभणी , सुभेदार मेजर थापा, हवालदार बीएसएफ संदीप मांडरे यांच्यासह बटालियन चे मेजर उपस्थित होते.