‘ जेऊर ‘ राष्ट्रीय छात्रसेनेकडून दत्तक
पैजारवाडी प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
स्वच्छ भारत या राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत ५६ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना कोल्हापूर (एन.सी.सी.) यांच्या वतीने जेऊर (ता.पन्हाळा) गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये जेऊर गावातील सार्वजनिक चौक, प्राथमिक शाळा, हायस्कुल, ग्रामपंचायत, गाव पाणवठा मंदिर व धार्मिकस्थळाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात यशवंतराव चव्हाण वारणा विद्यालय वारनगर, तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकेडमी विनयनगर, पराशर हायस्कुल पारगाव, कोडोली हायस्कुल कोडोली व छ.शिवाजी हायस्कुल जेऊर येथील दिनशे पन्नास छात्र सैनिकानीं सहभाग नोंदवला होता.
स्वच्छता अभियान उपक्रमामध्ये सुरवातीला सकाळी स्वच्छते बाबतच्या घोषणा देत जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीसाठी छात्रसैनिकांसोबत प्राथमिक शाळेतील आणि छ.शिवाजी हायस्कुल मधील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे स्वच्छता अभियांन ५६ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना कमाडिंग ऑफिसर कर्नल डॉ.साजी अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन श्री.चौगुले,लेफ्टनंट डॉ.एस.एस.खोत, सुभेदार श्री.कांबळे आणि सुभेदार मेजर जयवंत डावरे यांनी आयोजित केले होते.
एन.सी.सी.अधिकारी से.ऑफिसर आर.एस.पाटील, बी.एस.मोरे, व सहकारी यांनी हे स्वच्छता अभियांन यशस्वीपणे पार पडले.
या सर्व एन.सी.सी.ऑफिसर अधिकाऱ्यांनी उपस्थित छात्रसैनिक, विद्यार्थी, ग्रामस्थाना स्वच्छतेचे महत्व, पाणी वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, डिजीटल इंडिया, कॅशलेस बँकिंग, हेल्मेट वापर व व्यसनमुक्ती अशा महत्वाच्या मुद्यावरून मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या शेवटी कमांडिंग ऑफिसर कर्नल डॉ.साजी अब्राहम यांनी जेऊर गाव राष्ट्रीय छत्रसेनेच्या वतीने दत्तक घेतल्याचे जाहीर करून गावाच्या सुख-दुखात सहभागी होणार असल्याचे सांगितले. गावाची ऐतिहासिक व भौगोलीक परिस्थिती पाहून एन.सी.सी.च्या उपक्रमाद्वारे गावाचा सर्वागीण विकास व्हावा. विविध योजनांची माहिती मिळावी, तसेच छत्रसेना व ग्रामस्थांचा संपर्क वाढुन त्याचा लाभ गावविकास व देशसेवेसाठी व्हावा, हा या योजनेचा मूळ उद्देश असल्याचे सांगून, जेऊर गाव आदर्श मॉडेल बनवण्याचा संकल्प व्यक्त केला .
उपस्थित ग्रामस्थांनीही टाळ्याचा कडकडाट करत, या संकल्पाचे स्वागत केले, व स्वछतेबाबत शपथ घेतली.
ग्रामस्थांच्या वतीने कर्नल साजी अब्राहम यांचा स्वागत व सत्कार सरपंच प्रियांका महाडिक यांच्या हस्ते, तर सुभेदार जयवंत डावरे यांचा सत्कार माजी उपसरपंच अशोक दाते यांनी केला. यावेळी सर्व ग्रा.पं. सदस्य, मुख्याध्यापक , शिक्षकवृद विविध संस्थाचे पदधिकारी व ग्रामस्त हजर होते.
सर्व एन.सी.सी.अधिकारी व छत्रसैनिकाचे आभार प्रकाश वरेकर यांनी मानले.