विद्यामंदिर वेखंडवाडी इथं ‘ मैत्री पुस्तकांशी ‘ या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात
पैजारवाडी प्रतिनिधी :- कृष्णात हिरवे
दिवसेंदिवस कमी होणारे वाचकवर्ग आणि वाचकविना ओस पडत असलेली वाचनालये, हे चित्र पालटण्यासाठी बालवयातच मुलांना वाचनाची आवड निर्माण होवून, सुजाण व संस्कारीत वाचक निर्माण व्हावेत, यासाठी विद्यामंदिर वेखंडवाडी (ता. पन्हाळा ) या शाळेने ” मैत्री पुस्तकांशी ” ह्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
मुलांवर बालवयातच वाचन संस्कार होवून, वाचन चळवळ वाढीस लागावी, यासाठी शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन या उपक्रमाची सुरूवात झाली.
शाळेतील शिक्षक गुलाब बिसेन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात प्रत्येकदिवशी एक अशी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख करून देण्यात येणार असून, छोटी छोटी गोष्टिंची पुस्तके वाचायला दिली जाणार आहेत. उपक्रमाच्या दुसर्या टप्प्यात शाळेत मुलांच्या आवडीच्या पुस्तकांचे क्रमश: वाचन केले जाणार आहे.
मैत्री पुस्तकांशी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजण्यास मदत होईल, असे मुख्याध्यापक अविनाश माने यांनी सांगितले.