सामाजिक

तातडीने न्याय द्या,अन्यथा वीजमंडळ वर हल्लाबोल : शेतकऱ्यांचा वीज मंडळाला इशारा

शिराळा : भागाईवाडी-अस्वलेवाडी-कणदूर येथील जळीतग्रस्त शेतकऱ्यांच्या डोंगररानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच तहसीलदार दिपक शिंदे यांनी याबाबत योग्य ते सहकार्य वीज वितरण कंपनी व येथील शेतकऱ्यांना करावे, असे आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.
शिराळा तालुक्यातील भागाईवाडी-अस्वलेवाडी-कणदूर येथील जवळपास ७७० एकरापेक्षा जास्त जळीतग्रस्त झालेल्या डोंगररानाची पाहणी आमदार शिवाजीराव नाईक यांनी तहसीलदार दिपक शिंदे, वीज वितरण कंपनीचे इस्लामपूर व शिराळा येथील अधिकारी तसेच या भागातील शेतकऱ्यांसमवेत केली.
सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे ७७० एकर मधील उभे गवत, कापलेले गवत तसेच वनसंपदा, लहान मोठे प्राणी या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. या परिसरात गेल्या आठ ते नाऊ वर्षापासून अशा घटना वांरवार घडत आहेत. त्याचबरोबर सन २०१५ च्या उन्हाळ्यात घडलेल्या जळीत घटनेत यशवंत खोत व बाळाबाई खोत या वयस्कर दांपत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. अशा घटना घडून देखील वीज मंडळाकडून याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दक्षता किवा खबरदारीचा उपाय केलेला नाही. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत.
घटनास्थळी आमदार नाईक यांनी भेट दिली, त्यावेळी शेतकरी-ग्रामस्थ यांनी आपला संताप व्यक्त करून, वीज वितरण कंपनी सहकार्य करीत नाही, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आम्हाला तातडीने न्याय द्या. अन्यथा आम्ही आमची जनावरे घेऊन वीज मंडळावर हल्लाबोल करू, असा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी नाईक म्हणाले, अशा घटना वांरवार घडूनही याचे गांभीर्य वीज वितरण कंपनीस नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. वीज वितरण कंपनी २०१३ च्या घटनेची शेतकऱ्यांना नोटीसा काढून पुरावे देण्याचे सांगत आहात. हे जबाबदारी टाळण्याचे काम आहे. मात्र या वेळेला वीज कंपनी तसेच महसूल विभाग यांनी सर्व पुरावे स्वतः नागरीकांचे सहकार्य घेवून गोळा करावेत. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या उर्जा मित्र बैठकीत याबाबत आपण टोकाची भूमिका घेवू. या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांचे जवळपास ६० ते ७० लाखाचेवर नुकसान झाले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. हे फक्त वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडले आहे. याची सर्वस्वी जबाबदारी वीज कंपनीने स्वीकारून, शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन करून काही बरी वाईट घटना घडल्यास, त्यांची सगळी जबाबदारी वीज वितरण कंपनी व इतर संबंधित विभागाची राहील.
तहसीलदार दीपक शिंदे यांनी मंडल अधिकारी, तलाठी यांना संबधित शेतकऱ्यांचे सात-बारा, खाते-उतारा व पंचनामा करनेसाठी लागणारी इतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे तातडीने देण्याचे आदेश दिले. वीज वितरण कंपनीचे अभियंता एस. ए. कोळी यांनी या जळीत घटनेचा सविस्तर अहवाल १५ जानेवारी पर्यंत देऊ, असे आमदार नाईक यांच्या समोर शेतकरी व ग्रामस्थ यांना सांगितले.
यावेळी रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, आनंदराव पाटील, भारत लुगडे, रामचंद्र पाटील, राजेंद्र खोत, रंगराव वाघ, भीमराव पाटील, पांडुरंग पाटील, बंडा पाटील, सहदेव पाटील, सिधू पाटील तसेच जळीतग्रस्त शेतकरी नामदेव पाटील, शामराव पाटील, गणपती पाटील, सुरेश, शिवाजी, दिलीप, मारुती, अमर लुगडे यांचेसह शेतकरी, ग्रामस्थ व अधिकारी व इतर लोक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!