सामाजिक

ग्रामीण महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्याचे काम आपला बझार ने केले- सौ. सुनीतदेवी नाईक

शिराळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्याचे काम सातत्त्याने सुरू असुन, त्यास माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मोलाची साथ आहे, असे प्रतिपादन आपला बझार संकुलाच्या अध्यक्ष सौ. सुनीतदेवी नाईक यांनी केले.
शिराळा येथील अंबामाता मंदिर प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष सौ. सुनंदा सोनटक्के अध्यक्षस्थानी होत्या.
सौ. नाईक पुढे म्हणाल्या कि , शिराळा तालुका ग्रामीण व डोंगराळ आहे. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. महिलांना घरातील कामाबरोबर शेती व दुध उत्पादनाशी निगडीत कामे करावी लागतात. त्यांनी या कामातून थोडी मोकळीक काढून मनोरंजन, खेळ, कलागुणदर्शन, स्पर्धामध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने अशा प्रकारचे आयोजन लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्ट चिखली व प्रचिती सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून केले जाते. दूध संघाच्या माध्यमातून महिला बचत गटांना दूध संकलन केंद्रे सुरू करून दिली आहेत. विराज उद्योग समूहात व आपला बझारच्या विविध शाखामध्ये महिलांच्या हाताला काम दिले आहे. घर बसल्या विविध पदार्थ पापड, लोणचे, शेवया, विविध प्रकारच्या चटणी, मसाले, मातीची व लाकडी खेळणी, झाडू, केरसुणी, खराटे, पाट्या, सूप, कापडी पिशव्या, कागदी आराशीचे साहित्य, राजीगर लाडू, दीपावलीचे साहित्य, विविध मातीच्या वस्तू आदी विक्रीसाठी आपला बझारच्या माध्यमातून हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून दिले आहे. शिराळा महोत्सवाचे आयोजन, मंगळागौरी स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यामागे ग्रामीण महिलांची प्रगती हाच एकमेव उद्देश आहे.
नगरसेवक सौ. अर्चना शेटे यांनी स्वागत, तर नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के यांनी प्रास्ताविकात केले. या वेळी रंजनाताई नाईक, शारदाताई नाईक, शुभलक्ष्मी नाईक, दिपालीताई नाईक, पंचायत समिती सदस्य वैशाली माने, मनीषा गुरव नगरसेविका सुनीता निकम, सौ. प्रतिभा पवार, आशाताई कांबळे, सुजाता इंगवले,वैशाली कदम, डॉ. मिनाक्षीताई पाटील, कल्पना गायकवाड, नंदाताई पाटील, वंदना यादव, राणी चव्हाण उपस्थित होत्या. डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, एस. एम. पाटील, मनीषा हसबनीस यांनी संयोजन व सूत्रसंचालन केले. साधना पाटील यांनी आभार मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!