भुईकोट किल्ल्यावर ‘ शौर्य दिन ‘ संपन्न
शिराळा प्रतिनिधी : ज्यांचे जीवन संघर्षमय होते, अशा शंभूराजांचे विचार आणि त्यांना सोडवण्याचा जो एकमेव प्रयत्न शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर झाला. त्या इतिहासाची आठवण रहावी, याकरीता ६ फेब्रुवारी ‘ शौर्य दिन ‘ म्हणून दरवर्षी साजरा करणार असल्याचे, प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते निलेश आवटे यांनी केले.
येथील भुईकोट किल्ल्यावर शौर्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रताप पाटील, संतोष देशपांडे, सीमाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आवटे म्हणाले, गेल्यावर्षी पासून ‘ शौर्य दिन ‘ साजरा करण्याची प्रथा चालू केली आहे. छत्रपती शंभूराजे यांना सोडवण्यासाठी मुघलांविरूद्ध शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर एकमेव लढाई झाली. यामध्ये या भुईकोट किल्याचे तत्कालीन सरदार तुळाजी देशमुख, त्यांचे सहकारी आपाजी दीक्षित, हरबा वडार, शंभूराजांचे निष्ठावंत मावळे जोत्याजी केसरकर यांचेसह स्वराज्यातील अनेक मावळे धारातीर्थी पडले. त्या दिवसाची आठवण भविष्यात कायम रहावी, म्हणून यापुढे हा दिवस सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात साजरा करावयाचा आहे. ज्यांनी या लढाईत वीरमरण पत्करले. त्यांचं आणि धर्मवीर शंभूराजांचे स्मारक या ठिकाणी शासनाने बांधावे. इतिहासाच्या पाऊलखुणा चिर स्मरणात राहव्यात, म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह नारायण जोशी, श्रीकांत इनामदार, भाजपच्या वैभवी कुलकर्णी, रुपाली कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गोपालकृष्ण पथ येथील तुळजाभवानीच्या मंदिरा पासून मुक पदयात्रेस सुरवात झाली. गुरुवार पेठ, मेन रोड, छत्रपती शिवराय पुतळा, सोमवार पेठ, पोटे चौक, लक्ष्मी चौक मार्गे ही पदयात्रा भुईकोट किल्ल्यावर आली. येथे छत्रपती शिवराय, शंभुराजे, तुळाजी देशमुख यांच्या प्रतिमेचे व भगव्या ध्वज स्तंभाचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी प.स. सदस्य लालासो तांबिट, भाजपा सरचिटणीस हरिभाऊ कवठेकर, प्रमोद पवार, उमेश कुलकर्णी, राजवर्धन देशमुख, देवेश कांबळे, सनी आवटे, दर्शन जोशी, केतन पाटील, सुनील गायकवाड, स्वप्नील निकम, संतोष गायकवाड, महेश खंडागळे, सचिन यादव, नितेश निकम, बाबा रोकडे, महेश गवंडी उपस्थित होते.