अनोळखी महिला मयताच्या हातात ‘ ओम ‘ ची अंगठी
शिराळा प्रतिनिधी : येळापुर-वाकुर्डे बुद्रुक मार्गावरील वराड खिंडीत महिलेचा खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी काळे म्हणाले कि , येळापुर- वाकुर्डे बुद्रुक मार्गावरील वराड खिंडीतील बाबाराम आटुगडे यांच्या जमीनी शेजारील नाल्या जवळील सिमेंट पाईप मधे अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाच्या महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे. तिचा चेहरा पूर्ण जळलेला आहे. तीच्या अंगावर जांभळ्या व गुलाबी रंगाची साडी असून ब्लाउज त्याच रंगाचे आहे. उंची १६२ से.मी.असून हात-पाय यांच्यावर मोठ्या जखमा आहेत. तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटात ओम लिहिलेली अंगठी आहे. दोन्हीं हातात काचेच्या व बेन्टेक्सच्या बांगड्या आहेत. या महिलेचा खून २ ते ३ आठवड्या पूर्वी घडला असल्याची शक्यता आहे. चेहरा ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटवणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या गावातील अथवा परिसरातील कोणती महिला बेपत्ता असल्यास, शिराळा अथवा कोकरुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.आपल्या आसपासच्या जिल्ह्यातून कोणी बेपत्ता असल्याची माहित मिळवण्याचे काम सुरु आहे.
मृतदेह मोठ्या प्रमाणात जळून गेल्याने, त्याच ठिकाणी चरण प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सर्वदा निर्मळे यांनी शवविच्छेदन केले. मृतदेह असलेल्या सिमेंटच्या पाईप शेजारी मेलेले कुत्रे सडलेल्या अवस्थेत सापडले आहे. त्या कुत्र्याचा मृत्यू कशामुळे झाला कि, कोणालाही मृतदेहाचा वास आला, तरी त्या कुत्र्याचा वास असावा, असा लोकांचा गैरसमज व्हावा, असा आरोपीने प्रयत्न केला असल्याची शक्यता असावी. येळापुरचे पोलिस पाटील उत्तम पाटील यांनी कोकरुड पोलीसात वर्दी दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे करत आहेत.
चौकट-अंगठीच महत्वाचा धागा
चेहरा पूर्ण जळाला असल्याने, ओळख पटवणे अवघड आहे, मात्र तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोटात ओम लिहिलेली अंगठी आहे. पायात जोडवे अथवा गळ्यात मंगळसूत्र अथवा इतर काही नाही. त्यामुळे ओळखीसाठी अंगठीच हा प्राथमिक एकमेव पुरावा आहे.