१७ फेब्रुवारी रोजी साखर संचालक कार्यालयावर भव्य मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा- वसंत पाटील
बांबवडे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
दि.१७ फेब्रुवारी रोजी साखर संचालक कोल्हापूर कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चास शेतकरी राजाने मोठ्या संख्येवर उपस्थित राहावे ,असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले.
यासाठी या मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
ऊसाचा पहिला हफ्ता ३०००/- रुपये देण्याचा ठरला असतानाही ,कारखानदार विविध कारणांच्या पळवाटा काढून तो २५००/- रुपये शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. ऊसाची ठरलेली रक्कम विनाकपात मिळाली पाहिजे. यासाठी या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता दसरा चौक पासून सुरु होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन वसंत पाटील यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी युवा आघाडी यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. या जनजागृती मोटारसायकल रॅली च्या वेळी शाहुवाडी तालुका अध्यक्ष वसंत पाटील, जयसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, गुरुनाथ शिंदे, अजित साळोखे, सुरेश म्हाऊटकर, प्रशांत मिरजकर, संतोष लाड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.