शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या ‘ सुरज ‘ चा दुर्दैवी अस्त : शिराळा तालुक्यातील घटना
शिराळा प्रतिनिधी : शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या घागरेवाडी ( ता शिराळा) येथील शिवशक्ती मंडळाचा युवा कार्यकर्ता सुरज मोहन खोचरे (२ ४) याचा काखे-मोहरे येथील कालव्याच्या संरक्षण काठड्याच्या अँगलला धडकून दगडावर पडून जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेल्या सुरज बाळू सुर्यवंशी (१९ ) हा २०फूट उडून कालव्याच्या पाण्यात पडल्याने सुदैवाने बचावला. शिवजयंती दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने शिवशक्ती मंडळ कार्यकर्ते, घागरेवाडी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना रविवारी रात्री दहा ते साडे दहा वजण्याच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी कि, घागरेवाडी येथील शिवशक्ती मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंती उत्सवानिमित्त मोटरसायकलने पन्हाळा गडाकडे शिवज्योत आणण्यासाठी निघाले होते.त्यांच्या सोबत सुरज सूर्यवंशी व सुरज खोचरे मोटरसायलवरून निघाले होते. सुरज खोचरे मोटारसायकल चालवत होता. जात असताना पन्हाळा तालुक्यातील काखे- मोहरे रस्त्याच्या कालव्याच्या संरक्षण अँगलला मोटरसायकलची जोराची धडक बसून दगडावर पडून सुरज मोहन खोचरे हा जागीच ठार झाला . पाठीमागे बसलेला सुरज सुर्यवंशी हा गाडीच्या धडकेने उंच २० फूट उडून कालव्याच्या पाण्यात पडला. त्याला पोहता येत असल्याने, पाण्यतून बाहेर येऊन त्याने आरडा-ओरडा केला. त्यावेळी पन्हाळा गडाकडे जाणाऱ्या शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्त्यानी सुरज खोचरे व सुरज सुर्यवंशी या दोघांना शासकीय रुग्णालय कोडोली ( ता. पन्हाळा ) येथे उपचारासाठी दाखल केले. सुरज खोचरे च्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे, डॉक्टरांनी सांगितले. सुरज खोचरे हा मुंबईत खाजगी कंपनीत नोकरीला होता. हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आला होता.
चौकट- एका सुरजचा अस्त तर एकाच उदय
शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोघांचे नाव सुरज असल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला कालव्यातील पाण्यामुळे जीवदान मिळाले. सुदैवाने त्यास पोहता येत असल्याने, व कालव्यात पाणी असल्याने त्याचा पुनर्जन्म झाला.या दुर्दैवी घटनेत एका सुरजचा अस्त तर एकाचा उदय झाला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती.