सामाजिक

नावली त भीषण आग :आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान : जीवित हानी नाही

पैजारवाडी प्रतिनिधी :
नावली (ता.पन्हाळा ) येथे दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या दहा ते बारा होळ्यांना आग लागून, सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या आगीत एक गाय गंभीर जखमी झाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नावली गावालगत असलेल्या, गायमाळ नावाच्या गायरानात अनेक शेतकऱ्यांनी गुरांसाठी रचून ठेवलेल्या कडबा, पिंजर, गवताच्या मोठ्या होळ्यांना दुपारी ३च्या सुमारास अचानक आग लागली. प्रथमदर्शनी आग पाहणाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा होऊन, आग विझवन्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आगीचे प्रमाण वाढल्याने, नंदकुमार मोहिते, कृष्णात मोहिते, शशिकांत पाटील, दयानंद कांबळे, किरण पोवार, इत्यादींची गवत होळ्या, काही महिलांनी पावसाळ्यासाठी साठवलेले सरपण, शेणगोवऱ्याचे ढीग या आगीत भस्मसात झाले .
या आगीत एक गाय होरपळून गंभीर जखमी झाली आहे. परिसरात पसरलेली आगीची तीव्रता लक्षत घेता, वारणा साखर कारखाना , वारणा दुध संघ, विश्वास साखर कारखाना, पन्हाळा व मलकापूर नगरपालिका येथिल अग्नीशामक दलास फोनद्वारे पाचारण करण्यात आले, व आग विझवण्यात आली. या आगीत सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी त्रिवेणी पाटील, सरपंच शीतल पाटील, ग्रामसेवक, ग्रा.प.सदस्य यांनी घटनेचा पंचनामा केला.
यावेळी पं.स सदस्य अनिल कंदूरकर , वैशाली पाटील, उपसभापती उज्वला पाटील, माजी मंत्री विनय कोरे, जि.प.सदस्य शिवाजी मोरे, आमदार सत्यजित पाटील, केडीसीसी संचालक बाबासाहेब पाटील, तहसीलदार रामचंद्र चोबे, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव , संदीप बोरकर हि मंडळी घटना स्थळी हजर होती.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!