स्मृतिदिन विकासाच्या सह्याद्रीचा
बांबवडे : आज रामनवमी. हा दिवस अनेकांच्या हृदयात घर करून गेलेला आहे. याच दिवशी शाहुवाडी च्या विकासाच्या उद्गात्याला शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघ मुकला. वाड्या वस्त्यावरील गरीब खेडूत त्यांच्या भाग्यविधात्या ला मुकला. अश्रूंनी भरलेलं एक वादळ याच दिवशी शांत झाल. आणि अश्रूंचा महापूर अवघ्या केवळ तालुक्यात नव्हे,तर जिल्ह्यात आला. त्या तुफानी वादळाचं नाव होत संजयदादा. या वादळाच्या अस्ताला आज तब्बल १८ वर्षे पूर्ण होत आहेत. आजही विषय निघाला कि, डोळ्यांच्या कडा ओलावाल्याशिवाय रहात नाहीत. अशा युगपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि मनापासून विनम्र अभिवादन.
आज दादांचा स्मृतिदिन. आजच्या दिवशी दादांचे चाहते आपसूकच सुपात्र्याच्या वाटेला लागतात. तिथे कोणत्या आमंत्रणाची गरज लागत नाही. समाधीजवळ गेला कि,प्रत्येक माणूस शांत होवून अंतर्मुख होतो. आज दादांच्या अस्तित्वाची उणीव प्रकर्षाने जाणवते. त्यांनी निर्माण केलेली तालुक्यातील जलसंपदा आजही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजूनही पोहोचलेली नाही.दादांच्या स्वप्नातील शेतकऱ्याचा खिसा आजही मोकळाच आहे. त्यांनी हि जलसंपदा तालुक्यातील शेतकऱ्याच्या उज्वल भवितव्यासाठी निर्माण केली होती. ह्या जलसाठ्यावर उपसा जलसिंचन योजना राबवून गरीब शेतकऱ्याला संपन्नतेचे स्वप्न त्यांनी दाखविले होते. ते अर्धे पूर्ण ही झाले होते.पुढील कामे करण्या अगोदरच काळाने डाव साधला.
इथला शेतकरी संपन्न होण्यासाठी एमआयडीसी चे आयोजन केले होते, जेणेकरून तालुक्यात औद्योगिक पर्व निर्माण होईल. याचबरोबर त्यांचे स्वतः ची वीज निर्माण करण्याची देखील संकल्पना होती. या सगळ्याबरोबरच वाड्या-वस्त्यावरील धनगर समाज शैक्षणिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांच्या योजना होत्या. अनेक विकासाच्या कामांचा डोंगर या अवलियाने रचून ठेवला होता.
कदाचित तालुक्याच दुर्दैव कि काय म्हणून हे आबालवृद्धांचे दादा आपल्याला सोडून गेले.
अवघे आभाळ कोसळले. तालुक्यावर आभाळमाया करणारा नेता आपल्याला सोडून गेला. प्रत्येकाच्या काळजाचा एक तुकडा निघून पडला आणि विकासाचा श्वास घेणेही कठीण झाले. आज त्याच दादांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करूया, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. पुनश्च त्या युगपुरुषाला, त्या तुफानी विकासाच्या वादळाला या किनार्यावरील वाळूच्या इमल्याचे मनापासून अभिवादन.