औरंगाबाद चे सुपुत्र ‘ किरण थोरात ‘ शहीद
मुंबई : महाराष्ट्राचा आणखी एक जवान देशासाठी लढता, लढता शहीद झाला आहे. औरंगाबाद चे किरण पोपटराव थोरात यांना पाकिस्तानबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आले.
काश्मीर च्या राजौरी सेक्टर मध्ये पाकिस्तान ने केलेल्या गोळीबारात ३१ वर्षीय किरण थोरात शहीद झाले असून, ते औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील फकीराबादवाडीचे रहिवासी आहेत.
काल दि.११ एप्रिल रोजी दुपारी कृष्ण घाटी आणि राजौरी सेक्टर मध्ये पाकिस्तान ने केलेल्या हल्ल्यामध्ये किरण जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.
किरण अकरा वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. अत्यंत धाडसी, कर्तव्यदक्ष जवान म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी आहे.