स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचा आज प्रथम स्मृतिदिन
बांबवडे : स्व. अशोकराव घोडे-पाटील नावाचं एक घोंगावणारं वादळ, एक वर्षापूर्वी याच दिवशी शांत झालं. याच दिवशी इथल्या तरुण पिढीचा एक बुरुज ढासळला. त्याच अशोकराव घोडे-पाटील ( भाऊ ) यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आणि यानिमित्त चाळवलेली आठवणींची पाने …
अशोकभाऊ म्हणजे तरुण पिढीचा आधारस्तंभ . दीनदुबळ्या, आणि पिचलेल्या समाजाला भाऊंनी नेहमीच मदतीचा हात दिला. भाऊंनी दिलेला शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला बाण असायचा. एकदा शब्द दिला कि, काम झाले म्हणून समजायचे,असा पवित्रा भाऊंचा असायचा. भाऊ म्हणजे घोंगावणारं वादळ. स्वतःच्या आयुष्यात कितीही कटू प्रसंग आले तरी चालतील, पण सामान्य जनतेला मात्र त्यांनी नेहमीच जपले. असे हे व्यक्तिमत्व आजारी पडले, आणि त्या आजारातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या दिवशी अवघ्या तरुणाईने फोडलेला हंबरडा, काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यादिवशी कुणी म्हणे माझा देव चोरला, तर कोण म्हणे ठेवू कुठे माथा ,अशा अनेक आक्रोश करणाऱ्या आरोळ्या बांबवडे च्या आसमंतात विरून गेल्या. भाऊंना मानणारा वर्गच वेगळा होता. त्यात लहान मुलांपासून वृद्ध ज्येष्ठांची संख्याही तितकीच होती.
असे स्व. अशोकभाऊ आपल्याला सोडून जावून एक वर्ष पूर्ण होत आहे. दिवस कधी निघून जातात, हे कळत नाही, पण माणसाने मिळवलेली माणसे, मात्र आपल्या माणसाची आठवण सातत्याने काढत असतात.
असे स्व.अशोकभाऊ सर्वसामान्यांच्या हृदयात कायमपणे विराजमान राहतील, यात शंका नाही. स्व.अशोकभाऊ यांना विनम्र अभिवादन, आणि आमच्या साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…