खोत पिता-पुत्रांचा प्रवेश तालुक्याच्या राजकारणाला कोणते वळण देणार ?

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील राजकारणाला एक नवी कलाटणी मिळत आहे. जनसुराज्य चे माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव खोत व पंचायत समिती सदस्य विजयराव खोत यांनी जनसुराज्य ला सोडचिठ्ठी देवून शिवसेना व मानसिंग दादा गटात प्रवेश केला आहे.याचा नक्की फायदा आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटाला होणार यात शंका नाही. कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, आपल्या मतांमध्ये आघाडी मिळवण्यासाठी याचा त्यांना उपयोग होणार आहे.
शाहुवाडी तालुक्यातील राजकारण नेहमीच गायकवाड व सरुडकर गटाभोवती फिरत आले आहे. परंतु विधानसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर तालुक्यात वारणा सह.साखर कारखान्याचे सर्वेसर्वा विनयरावजी कोरे यांचे पदार्पण झाले. तेही मानसिंग दादा यांच्या सहकार्याने. तालुक्यात विनय कोरे यांनी बाजी मारली,आणि राज्याचे फलोत्पादन मंत्री म्हणून प्रथमच लाल दिवा मतदारसंघात फिरू लागला. या लाल दिव्याच्या प्रकाशाला अनेक मंडळींनी समर्थन दर्शविले. दरम्यान यामुळे पारंपारिक विरोधक संजयदादा गट व सरुडकर गट हे दोन्हीही गट आमदारकीच्या शर्यतीत मागे पडले. परंतु यानंतर मात्र आमदार सत्यजित पाटील यांनी मानसींग दादा यांच्या सहकार्याने पुन्हा कंबर कसली. इकडे असे तर दुसरीकडे केडीसीसी बँकेची निवडणूक लागली. यात विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवला. आणि खऱ्या अर्थाने विरोधाचा वणवा पेटला. कारण या निवडणुकीत संजयदादा गटाचे कर्णसिंह गायकवाड यांनी आपल्या चुलत्याची पाठराखण न करता घरचे वाद चव्हाट्यावर आणत, सर्जेराव यांना मदत केली. यापासून आमदार सत्यजित पाटील यांच्या पाठीशी ठाम रहाण्याचा निर्णय मानसिंग दादा यांनी घेतला. तर कर्णसिंह यांनी जनसुराज्य गटाची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी भविष्यातील काय आडाखे बांधले हे त्यांनाच माहित. कारण माजी आमदार विनय कोरे हे आपली आमदारकी कर्णसिंह यांना कुठल्याही परिस्थितीत देणार नाहीत. हे कोणीही सांगेल. तरीदेखील कर्णसिंह यांनी जनसुराज्य ची पाठराखण का केली हा सर्वसामान्य जनतेला पडलेला अनुत्तरीत प्रश्न आहे. दरम्यानच्या काळात नामदेवराव खोत हे एकेकाळचे संजयदादा गटाचे मिनी आमदार समजले जात होते. ते या अगोदरच जनसुराज्य मध्ये दाखल होते. दरम्यान त्यांना तालुकाध्यक्ष पद देखील देण्यात आले. परंतु केडीसीसी चे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्याशी नामदेवराव आबा यांचे सूत जुळत नव्हते. गेले अनेक महिने हि धुसफूस सुरु होती.
कालच्या पक्ष प्रवेशाने या धुसफुशीला पूर्ण विराम दिला. एकंदरीत जनसुराज्य पक्ष आणि सत्यजित पाटील व मानसिंग दादा गट यामध्ये सध्या तरी आमदार सत्यजित पाटील व मानसिंग दादा गटाचे पारडे जड आहे. असे सर्व सामन्यांचे म्हणणे आहे. कारण गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्ष व यातील नामदेवराव खोत गट, सर्जेराव पाटील पेरीडकर गट, कर्णसिंह गायकवाड गट एकत्र असूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सध्य स्थिती त्याहूनही बदलली आहे. मानसिंग दादांचे चिरंजीव रणवीरसिंह गायकवाड यांना पचवावा लागलेला जिल्हा परिषदेचा पराभव अजूनही जुना झालेला नाही. कर्णसिंह गायकवाड जरी जनसुराज्य च्या बाजूने उभे असले, तरी नामदेवराव खोत यांच्या सोडचिठ्ठी मुळे त्यांच्या मतांवर निश्चितच परिणाम होणार आहे. त्यात नुकतेच जनसुराज्य चे पक्ष प्रवक्ते जाधव यांनी त्यांच्याच शिक्षण मंडळाच्या सचिवांच्या चौकशीची केलेली मागणी ,जनसुराज्य मध्ये सुद्धा सगळे आलबेल आहे, असं दर्शवत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे सध्याचा नामदेवराव खोत यांचा प्रवेश विद्यमान आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्याच फायद्याचा होतोय,असे दिसून येते.
दरम्यान शाहुवाडी पंचायत समिती मध्ये अमरसिंह खोत हे एकमेव विरोधी सदस्य राहिल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीत जनसुराज्य चे माजी मंत्री विनयरावजी कोरे यांची पुढची चाल काय असणार आहे, त्यांची पुढची रणनीती काय असेल, हे येणारा काळंच ठरवेल. दरम्यान कर्णसिंह गायकवाड हे आपल्या गटासाठी नेमका काय निर्णय घेणार आहेत. आज सध्यस्थितीत ते जरी जनसुराज्य ची पाठराखण करत असले, तरी त्याचा गटाला नेमका काय फायदा होणार आहे, आणि संजयदादा गट जर टिकवायचा असेल तर काहीतरी ठोस निर्णय घेणे, हे काळाची गरज आहे. गेली चार वर्षे जनसुराज्य ची पाठराखण करूनही, त्याचे फळ गटाच्या पदरात काय पडले ? हा संशोधनाचा विषय आहे. तेंव्हा त्यांनासुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा अगोदरच संभ्रमात असलेला गट काय निर्णय घेईल, हे सांगता येत नाही.
एकंदरीत खोत पिता-पुत्रांचा प्रवेश शाहुवाडी तालुक्याच्या राजकारणाला कोणते वळण देणार ? हे काळच ठरवेल.

4+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!