मसाई पठारावर उभं राहतंय ‘ व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्क ‘
बोरपाडळे वार्ताहर :-
लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेती व्यवसाय बरोबरच पर्यटन वाढीकडे लक्ष देने गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्क मुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे,असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जेऊरच्या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणाऱ्या, मसाई पठाराच्या पायथ्याशी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून जेऊर ग्रामपंचायत, वन विभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती जेऊर यांच्या संयुक्त विद्यमानाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या व्हर्टीकल ॲडव्हेंचर पार्कचे उद्घाटन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी या पार्क साठी पर्यटकांना येणे- जाणे सुलभ व्हावे, म्हणून या भागातील रस्ते दुरुस्त करणार असलेचे जाहीर केले. तसेच
अत्यावश्यक सर्व सुविधा व निधि पुरविण्याचे आश्वासन दिले असून, पार्कमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन ही त्यांनी केले.तर या पार्कची प्रसिध्दी च्या उद्देशाने हिवाळी व उन्हाळी सुट्टीत या ठिकाणी येणाऱ्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीत पास सुविधा उपलब्ध केली असून, अशा पास धारक विद्यार्थ्यांना येथे नाममात्र शुल्कात प्रवेश दिला जाईल. बाकी उर्वरित आकारणी शुल्क आपण देणार असलेचे त्यांनी जाहीर केले. जनतेने पारंपारिक शेती व्यवसायावर अवलंबून न राहता, शासनाने राबविलेल्या कुकुट पालन, शेळी पालन, या संकल्पना स्वीकाराव्यात. पर्यटन वाढीसाठी आडवाटेवरील कोल्हापूर, राधानगरी येथील काजवा महोत्सव सारख्या उपक्रमातून स्थानिक लोकांना फायदा व्हावा, या उद्देशाने हा पार्क उभारला असलेचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांना गावातच रोजगार मिळाल्याने, त्यांचे शहराकडे रोजगाराचे शोधार्थ येणारे लोंढे थांबतील. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामिण भागही स्वयंपुर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
स्वागत उप वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल यांनी केले, तर प्रास्ताविक सरपंच प्रियांका महाडिक यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, प्रभारी तहसीलदार अनंत गुरव, के.डी.सी.सी..संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पंचायत समिती सदस्य
अनिल कंदूरकर, सचिन सिपुगडे, बाळासो खांडेकर, केदार उरुणकर, विलास पोवार, उत्तम कंदूरकर, वंदना पोरे, बाळासो भोसले व वनविभागाचे कर्मचारीव नागरिक उपस्थित होते.