शाहूवाडी पोलीस ठाण्याचा ‘ झटपट निवाडा ‘ : एकाच दिवशी ५६ प्रकरणांची निर्गत
शाहूवाडी : शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘ झटपट निवाडा ‘ उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमा अंतर्गत एकाच दिवशी ५६ प्रकरणांची निर्गत करण्यात आली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘ पेंडिंग वर्क ‘ च्या कामातून निपटारा होत आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे शाहूवाडी ग्रामीण चे पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील यांनी सांगितले.
याबाबत पाटील पुढे म्हणाले कि, पोलीस ठाण्यांमध्ये कामांची निर्गत लवकर होत नाही,याचे कारण असे आहे कि, तक्रारदर योग्य त्या ठिकाणी तक्रारीचे निराकरण करत नाहीत. ज्याठिकाणी तक्रारीचे निवारण होईल,अशा मार्गाचे मार्गदर्शन तक्रारदारास होत नसल्याने कामे पेंडिंग राहतात. यासाठी पोलीस कर्मचारी तपास आणि कामांचा निपटारा यात अडकून राहतो. यामुळे तक्रारदारास वेळेत न्याय मिळत नाही. यासाठी, ज्याठिकाणी तक्रार आहे त्याठीकाणाचे पोलीस कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार आहे,अशी मंडळी एकेठिकाणी बोलवून,त्यांना ,त्यांच्या तक्रारीसंदर्भात योग्य मार्गदर्शन करून तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करणे,यासाठीच हा ‘ झटपट निवाडा ‘ उपक्रम राबविला जात आहे. याअगोदर एका प्रकरणाला सव्वा महिना लागायचा, पण या उपक्रमामुळे हीच प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागत आहे.
शाहुवाडी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ‘ झटपट निवाडा ‘ संपन्न झाला. या उपक्रमा अंतर्गत महत्वाचे २४ गुन्हे, ४ अकस्मात मयत, २४ वरिष्ठ तक्रार अर्ज, १ स्थानिक अर्ज, ३ हरवलेली मंडळी,अशा एकूण ५६ प्रकरणांची निर्गत करण्यात आली.
यावेळी शाहूवाडी ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक आर.आर.पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर रानमुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत यम्मेवार, संजीव झाडे, व पोलीस कर्मचारी,तक्रारदार व त्यांचे विरोधक आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.