श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात श्री संत यशवंत शिंदे (बाबा) जयंती संपन्न
वारणा कापशी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचालित, येथील श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात श्री संत यशवंत शिंदे (बाबा) यांची ९७ वी जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमा पूजन व संस्थेच्या प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. युवराज ए. भोसले होते.
आपल्या भाषणात शिंदे बाबांना अभिवादन करताना म्हणाले कि, श्री संत गाडगेबाबांच्या कार्याच्या प्रसारासाठी पोलीस खात्यातील फौजदार पदाचा त्याग करून अवघे आयुष्य समर्पित केलेले, श्री संत शिंदे बाबा आधुनिक काळातील वैराग्यमूर्ती होते. देश व समाजसेवेसाठी ब्रम्हचर्य व्रत घेवून चंदनाप्रमाणे झिजणारा हा तपस्वी, स्वातंत्र्यासाठी कारावास भोगलेला लढवय्या स्वातंत्र्य सेनानी होता. शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे निकटवर्ती सहकारी शिंदे बाबांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उभारणीत सहयोग दिला. कापशी येथील महाविद्यालय, वसतिगृह व श्री सिद्धेश्वर हायस्कूल हि त्यांची जिवंत स्मारके आहेत.
समारंभात श्री. दिनकर पोतदार, संजयकुमार लुगडे, पोलीस पाटील, हेमंत बेंद्रे यांनी आपल्या मनोगतांमधून शिंदे बाबांच्या आठवणी जागवल्या. समारंभास उपमहाराष्ट्र केसरी विजेते सामाजिक कार्यकर्ते श्री महिपतराव केसरे आप्पा यांची विशेष उपस्थिती होती. श्री संत शिंदे बाबा जयंती च्या औचित्याने परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
समारंभाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. संजय सुतार यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. एस.व्ही. नवले यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्ग समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन प्रा.निलेश जाधव यांनी केले.