छत्रपती शिवरायांचे नाव छातीवर आणि शंभूराजांचे नाव पाठीवर घेऊन कोरोना पराभूत करू….

बांबवडे : छत्रपती शिवरायांचे नाव छातीवर आणि शंभूराजांचे नाव पाठीवर घेवून फिरणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्रातच एवढे “ कोरोना ” रुग्ण का?  इथली माती अनेकांना सामावून घेवून त्यांची पोटं भरणारी हि आई आहे. अनेक प्रांतातून येवून इथं नोकरी उद्योग करून जगणारी मंडळी इथं आहेत. त्यामुळे इथली रुग्णांची संख्या अधिक आहे. हि आकडेवारी पाहून घाबरून न जाता त्याला सामोरे जावू या, आणि कोरोना ला कायमचे रडायला लावू या.

 देशात कोरोना ने उच्छाद मांडला आहे. कोण्या गावाचे पाप आज आपल्या भारतीयांना ‘ सळो कि पळो ’ करून सोडत आहे. अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. पण तरीसुद्ध भारतासारख्या पुण्यभूमीने मोठ्या हिमतीने कोरोना सारख्या गनिमाला रोखून धरले आहे. आणि हे महत्कार्य आरोग्यविभागाचे डॉक्टर्स ,परिचारक- परिचारिका, पोलीस यंत्रणा आणि त्यांच्याबरोबर असलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी या शिलेदारांनी केले आहे. यास्तव त्यांचे करू तितके कौतुक थोडेच आहे. परंतु याचबरोबर आपली सुद्धा काही कर्तव्ये जनता म्हणून आहेत,ती आपण पाळतोय का? हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे.

कोरोना हा कोण्या व्यक्तीला जात, पंथ,धर्म विचारून होत नाही. त्याच्यापुढे सर्व सारखेच आहेत. म्हणूनच आपण स्वत:हून पुढे येणे, हि काळाची गरज होवू लागली आहे. कारण हा विषाणू संसर्गजन्य आहे, त्यामुळे तो कधी पसरेल, हे सांगता येत नाही. त्याचबरोबर त्याला घाबरण्याचे देखील काम नाही. कारण त्याला पराभूत करण्यास आपले डॉक्टर सज्ज आहेत. पण वेळेत त्यावर उपाय झाला पाहिजे. याची लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधा. नाहीतर हा आपल्या संसारावरून गाढवांचा नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही. आपली जात, धर्म सांगण्यास कोणी शिल्लक तर राहिले पाहिजे. कोणत्याही अफवांना बळी न पडता सामोरे येणे, हे आपले राष्ट्रकार्य आहे.

आज देश संकटात आहे, अशावेळी आपल्या देशाच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. भले कोण काहीही सांगत असेल, जर आपण खरंच भारतीय आहोत, तर भारतावर आलेल्या संकटाला एकत्रपणे सामोरे जावू या. यातूनही कोण संशयित रुग्ण समोर येत नसेल, आणि कोणाला शंका असेल तर याची माहिती प्रशासनाला पुरवा, जेणेकरून या देशावरच्या संकटाला वेशीवरच रोखण्यास यश येईल. यात कोणता धर्म, जात, पंथ हा भेद मानू नये.

त्याचबरोबर आपल्या जनतेच्या संरक्षणासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्रं ठेवून, जि खाकी वर्दी उभी आहे, त्यांना सहकार्य करा. जे आरोग्य कर्मचारी तुमच्यासाठी अहोरात्र राबत आहेत, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगा, आणि जे बाळगीत नाहीत, त्यांनासुधा बाळगायला लावा. आज जर कोणी आमच्या खाकी वर्दिवाल्या बांधवांशी मस्तवालपणे वागत असेल, तर त्यांनासुधा चार समजुतीचे शब्द सांगा. आणि ऐकलं नाहीच, तर मात्र अशा मंडळींविरुद्ध समाजाने उभे राहिले पाहिजे. त्याचबरोबर वर्दीतल्या नागरिकांनी सुद्धा स्वसंरक्षण केले पाहिजे, त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा बघ्याची भूमिका न घेता वर्दी ची किंमत दाखवून द्यायला हवी. त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा अशा प्रकरणात लक्ष घालून अशा समाजकंटकांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.

हे कोरोना विरुद्ध चे युद्ध आहे, आणि आपण ते जिंकणारच. कारण हा भारत देश आहे. इथल्या मातीतंच इतकी ताकद आहे, कि काय बिशाद आम्हाला कोण हरवेल. पण संशयाचे भूत डोक्यातून काढून टाका परदेशातून येवून कोणी काही सांगणार असेल, तर ते आपल्या देश हिताचे नाही, एवढे लक्षात असू द्या. आपल्या एकतेबाबत कोणाला शंका उत्पन्न होईल असे वागू नका. पुन्हा कोरोना शी दोन हात करणाऱ्या खाकी वर्दीला, आणि पांढऱ्या वेशात तुमच्यासमोर येणाऱ्या देवदूतांना, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा…

6+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!