“ उद्धवा” खंबीर तुझे सरकार

बांबवडे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या कौशल्याने राज्याचा कारभार इतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने चालवीत आहेत. आज शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते,तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या या कर्तबगार मुलाचा त्यांना अभिमान वाटला असता. साहेबांच्या रक्ताने अशी उसळी घेतली, कि अवघे राज्य पुन्हा एकदा “ साहेब ” आल्यासारखे वाटत आहे. कारण एकेकाळी अनेक संकटातून मुंबई आणि महाराष्ट्राला वाचविण्याची क्षमता ठेवणारे “ साहेब ” नेहमीच मराठी माणसाच्या पाठीशी थांबलेले आम्ही पाहिले आहेत. परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटतं,कि विरोधी पक्ष यातही राजकीय खेळी खेळण्याच्या प्रयत्नांत असल्याचे दिसून येत आहे.

काही गोष्टी ज्या चांगल्या आहेत, त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. साधा आमदारकीचा अनुभव नसणारी व्यक्ती, आज एका कुशल राजकारण्याप्रमाणे उद्धवजी राज्यकारभार चालवीत आहेत. अवघ्या चार पाच महिन्याच्या कालावधीत आलेलं कोरोनाचे संकट ते शिताफीने निभावत आहेत. त्यांनी केलेलं टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन एका कुशल कारभाऱ्यापेक्षा कमी नाही.  एकीकडे कोरोना आपला फास मुंबई सह महाराष्ट्राभोवती आवळत असताना, काही मंडळी मात्र राजकीय खेळी करण्याच्या खटाटोपात आहेत. वड्याचं तेल वांग्यावर काढंत कोणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. तर राज्यातील काही मंडळी राज्यपालांना भेटून समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आज देश संकटात आहे. आपले महाराष्ट्र राज्य संकटात आहे. अशावेळी शासन आणि प्रशासन यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हि काळाची गरज आहे. अशावेळी भाजप ची मंडळी मात्र राजकीय खेळी करण्यात गर्क आहेत. आपल्या कोल्हापूरचे माजी मंत्री हे काहींच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. हि राजकारणाची वेळ नाही, असे असतानाही, हा बालिश खेळ खेळण्यात विरोधी बाकावर बसणारी मंडळी व्यस्त आहे.

ज्या शिवसेनेने बोटाला धरून राजकारणात ज्यांना उतरवले, तीच मंडळी त्यांचे पाय खेचू पाहत आहेत. हा कृतघ्नपणा नाही का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्याकाळची भाजप ची मंडळी म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी यांनी बाळासाहेब यांच्याशी सोबत करून मुंबई आणि राज्यात आपले बस्तान बसवले होते. हे सध्याची मंडळी विसरत आहेत.

हे जरी खरे असले तरी बाळासाहेबांच्या रक्ताने अशी उसळी मारली कि, अनेकांना आपली बोटे तोंडात घालावी लागली. कारण एका कसलेल्या राजकारण्या सारखे निर्णय घेवून साहेबांचे नाव त्यांनी सार्थ ठरवले आहे. एकीकडे विरोधात असलेले केंद्र शासन आणि दुसरीकडे आपणच वाढवलेली राज्यातील भाजप समांतर सरकार चालवण्याच्या खटाटोपात असतानाही, ते आपला तोल सावरीत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढवणाऱ्या मरकज च्या संपर्कातील मंडळीनी त्यांच्या डोक्याला आणखी त्रास वाढवला आहे. या भयंकर परिस्थितीत उद्धव ठाकरे मात्र स्वत:च आपल्या गाडीचे चालक बनून आपला तोल सांभाळत राज्याचा शकट चालवीत आहेत. अशा कर्तृत्वसंपन्न मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खऱ्या अर्थाने “ सलाम ”.

2+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!