बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करणार : मलकापूर नगर परिषद
शाहुवाडी प्रतिनिधी :
मलकापूर शहरात यापुढे पुणे-मुंबई सह बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्या बरोबर त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करायचे आहे. कोणीही बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती लपवू नये, त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शिला पाटील यांनी केले.
दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. मुळातच शाहूवाडी तालुक्यात तीन कोरोना रुग्ण सापडल्याने, सर्वत्र कडक संचारबंदी आहे. यानंतर आता पुणे मुंबई व बाहेर गावाहून नागरिक येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घ्यावयाची दक्षता, यासाठी मलकापूर नगर परिषदेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
मलकापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने, परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांची याठिकाणी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत सर्वांनी सतर्कतेने संचारबंदीच पालन केलं आहे. यापुढेही कसोटीचा काळ असून, आता नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे, गरजेचे आहे. पुणे मुंबई सह अन्य ठिकाणांहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती कोणीही लपवून ठेवू नये. अनोळखी व्यक्ती आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, मलकापूर शहरात संस्थात्मक विलगीकरण ची सोय करण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्यांची अशा ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.
शहरातील व्यापारी वर्गाबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनीही यापुढील काळात अतिशय दक्ष राहणे गरजेचे असून, खबरदारी म्हणून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. गर्दी न करता सोशल डीस्टंसिंग चे पालन करावं, त्याबरोबरच शहरातील एटीएम सेंटरमध्येही दर एक तासाने फवारणी करून दक्षता घेतली जात आहे. याबाबत नागरिकांनी मनात भीती बाळगू नये.
या बैठकीस उपनगराध्यक्षा सोनिया शेंडे, नगरसेवक दिलीप पाटील, प्रवीण प्रभावळकर ,बाबासाहेब पाटील, रमेश चांदणे ,नगरसेविका माया पाटील ,पालिकेचे अधिकारी ए. के. पाटील ,प्रसाद हर्डीकर , अभय शिरोलीकर आदी उपस्थित होते.