कोरोना संदर्भात सतर्कतेचे आवाहन : मलकापूर नगराध्यक्ष अमोल केसरकर
शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने आज अखेर १२ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह झाले आहेत, तर एक मृत झाला आहे. समूह संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहाणेआवश्यक आहे. कुणीही कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मलकापूर नगरपरिषद चे नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी केले आहे.
त्याचबरोबर , दोन दिवसात पाच रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आल्याने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे, तर नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी शीला पाटील यांनी केले आहे.
प्रशासनाने अजूनही अधिक सक्षमपणे यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचे, मत उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर यांनी व्यक्त केलं आहे. या घटनेकडे गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे, यात दुर्लक्ष अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधितांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली जाईल.
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद च्या वतीने शहरातील घर टू घर आरोग्य तपासणी केली असून, यातील निष्कर्ष अनुसार संशयित रुग्णांना तातडीने कोरोना बाबत तपासणी करण्यास हलवलं जात आहे. या अनुषंगाने आज दोन रुग्ण पोझीटीव्ह आले आहेत. याची खबरदारी म्हणून शहरातील नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये, तसेच घरात कोणी आजारी असल्यास तातडीने मलकापूर नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा.
आज अखेर बाजारपेठ परिसरातील आरोग्य तपासणी सर्व्हे झाला असून, उर्वरित ठिकाणीही आरोग्य तपासणी सुरु आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावं, व्यापारी वर्गासह सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, मलकापूर शहरात समूह संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे, नागरिकांनी कोरोना बाबत दक्षता घ्यावी.