सह्याद्रीच्या कुशीचा पदर देशासाठी रिता झाला…
आज सह्याद्रीच्या कुशीने पुन्हा एकदा आपल्या मायेचा पदर मातृभूमीच्या रक्षणासाठी रिता केला. आणखी एका अनमोल हिऱ्याचं देशासाठी बलिदान दिलं. त्या शहीद जवानाच नाव आहे, शहीद नानाश्री भगवान माने. या जवानासाठी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान या शहीद जवानाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आई, पत्नी चार वर्षाचा मुलगा, दोन बहिणी यांच्या घरट्यातील एक पाखरू मात्र, आकाशात भुर्रकन उडून गेलं. पण जाता, जाता मात्र आपला बहिणीला दिलेला शब्द खरा करून गेलं. आपला राष्ट्रीय ध्वज ” तिरंगा ” स्विकारण्याचा बहुमान बहिणींना देवून, रक्षाबंधनाची ओवाळणी पूर्ण करून गेलं.
या वर्षी लॉकडाऊन असल्याने ,रस्ते बंद होते. रक्षाबंधनासाठी पुनवत इथं जाणं अशक्य होतं. अशा परिस्थितीतही त्यांची मोठी बहिण पूनम ह्या आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी नदीपात्र ओलांडून गेली. बहिणीचे हे प्रेम पाहता, भावाने देखील सांगितले कि, दीदी तुझी आजची ओवाळणी उदार राहिली. ती मी तुला अशी देईन, कि तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. नकळत भावी घटनांचा या भावंडांना अंदाज सुद्धा नसेल कि, नियतीने या पुढे कोणता खेळ खेळला आहे. या भावनिक भावाने आपल्या बहिणीला ” तिरंगा ” स्विकारण्याचा बहुमान दिला, आणि आपला शब्द खरा केला. या तिरंग्याचं ओझं सांभाळताना, त्या ताईचा पदर देखील अश्रूंनी गदगदला असेल. कारण अशी रक्षाबंधनाची ओवाळणी क्वचितच कोणा बहिणीला लाभली असेल. या ओवाळणीनं बहिण-भावाचं नातं कृतकृत्य झालं, असे म्हंटल्यास वावग ठरू नये.
शहीद जवान श्री. नानाश्री भगवान माने ( आंदळकर ) हे शिराळा तालुक्यातील पुनवत गावचे सुपुत्र होत. तसेच वर्षा पाटील व बांबवडे इथं कर्मभूमी असलेले, बबन गोळे यांच्या पत्नी पूनम गोळे, यांचे ते धाकटे भाऊ होत.
या भावाला काय कळलं माहित नाही कि, सुट्टीनंतर सेवेत परत रुजू होताना ते सांगून गेले कि, दीदी, मी तुझी ओवाळणी निश्चित देणार आहे. बहिणीलाही त्यावेळी असे काही घडेल, याची कल्पना नव्हती. आणि जिगरबाज भावाने आपल्या बहिणीला देशाचा सर्वोच्च बहुमान असलेला ” तिरंगा ” स्विकारण्याचा बहुमान उपहार म्हणून मिळवून दिला. हि ओवाळणी स्विकारताना बहिणीचा पदर देखील जड झाला असेल. कारण त्या तिरंग्या खाली अनेक शहीद जवानांचे हौतात्म्य आयुष्याचा गालीचा करून पसरला आहे, आणि मगच ते अमर झाले आहेत. हा प्रसंग इतका भावनिक आहे कि, तो शब्दबद्ध करताना लेखणी सुद्धा क्षणभर थरथरली.
हे शहीद जवान पुनवत येथील आंदळकर घराण्याचे वंशज होते. या घराण्याला कुस्तीची परंपरा आहे. आणि हि परंपरा शहीद माने यांनी अखंडितपणे सुरु ठेवली आहे.फरक एवढाच कुस्तीची परंपरा ” लाल मातीची ” ,आणि हि परंपरा ” रक्ताने लाल केलेल्या मातीची ” .
शहीद माने यांच्या ताई पूनम गोळे सांगतात कि, शहीद नानाश्री जन्माला आले त्यावेळी त्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यावेळी त्या मंडळींना याचे कोडे पडले होते. परंतु त्याचं उत्तर आत्ता सापडतंय, कि, हा जवान जन्माला येतानाच आभाळात फडकणाऱ्या तिरंग्याला सलामी देतंच, जन्माला आले , आणि तिरंग्यासाठी च शहीद झाले .
शहीद नानाश्री माने यांचा जन्म पुनवत इथं ३१ ऑगस्ट १९९० रोजी झाला. त्यांचे शिक्षण सागाव येथील समाजविकास विद्यालयात झाले. आंदळकर घराण्याला शोभेल, अशीच त्यांची शरीरयष्टी होती, त्यामुळे त्यांची ” बीएसएफ ” मध्ये सहज निवड झाली.
तसं पाहिलं तर, माने कुटुंबियांवर आयुष्यभर नियतीचे आघातच होत गेले. शहीद नानाश्री माने अवघ्या दीड वर्षाचे असतानाच, त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. मुलं वडिलांच्या मायेला पारखी झाली. तरी त्यांच्या आई शशिकला भगवान माने यांनी या मुलांचा सांभाळ मोठ्या हिमतीने केला. अवघं आयुष्य कष्ट करण्यात गेलं. एकंदरीत काय या कुटुंबाने आयुष्यभर नियतीचे प्रहारच सहन केले आहेत. शहीद जवान यांना चार वर्षाचा मुलगा आहे. त्याचे नाव “ध्रुव” .
आज जवानाच्या या शहादत ने पुन्हा एकदा देशभक्ती श्रेष्ठ ठरवली आहे. केवळ कुटुंब जगवताना मेटाकुटीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे उदाहरण देशासाठी कृतकृत्य होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. अशा या शहीद जवान नानाश्री माने यांच्या कुटुंबियांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर त्या बहिणींना हि अभिवादन कि,ज्यांना असा जिगरबाज भाऊ आणि आंदळकर घराण्याला देशप्रेमी वंशज लाभला.धन्य झाली त्या मातेची कूस, जिने देशभक्ती साठी जवान दिला. त्या मातेलाही विनम्र अभिवादन. आणि शहीद जवान नानाश्री माने यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख सलाम,ज्यांनी जाता,जाता मातृभूमीच्या पदरात आणखी एक भावी जवान ” ध्रुव ” च्या रूपाने टाकला.