१५ व्या वित्त आयोगाची कामे बोर्ड लावूनच करावीत-विजयराव खोत
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कायदेशीररीत्या पुनर्स्थापित करावा, त्याचबरोबर पंचायत समिती च्या जुन्या इमारती समोरील छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा जोतीराव फुले या तीन महापुरुषांच्या पुतळ्यांचे नव्या इमारतीसमोर पुनर्स्थापित करावे, कारण नव्या इमारती मुळे, जुन्या इमारती समोरील या तीन महापुरुषांचे पुतळे अडगळीत पडल्यासारखे वाटतात. ते जर नव्या इमारतीसमोर पुनर्स्थापित केले गेले, तर या महापुरुषांचे पुतळे अडगळीत पडल्यासारखे वाटणार नाहीत, असे मत पंचायत समितीचे उपसभापती विजयराव खोत यांनी सभागृहात सांगितले.

शाहुवाडी पंचायत समिती ची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ सुनिता पारळे होत्या, तर सचिव म्हणून गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे यांनी काम पहिले.
यावेळी शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. यावेळी नळ पाणी पुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक शाळा, अंगणवाडी व शासकीय कार्यालये यांना १०० दिवसात नळ पाणी पुरवठा करण्यात यावा, असे सांगितले.

दरम्यान उपसभापती विजयराव खोत यांनी १५ वा वित्त आयोगाची कामे व खर्च ज्याठिकाणी कामे केली गेली आहेत, त्याठिकाणी त्यांचे बोर्ड लावण्यात यावेत. आणि ज्याठिकाण चा खर्च, त्याचं ठिकाणी करावा,असाही मुद्दा उपस्थित केला.
यावेळी अमरसिंह खोत यांनी मानोली येथील नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी,असे सांगितले. दरम्यान नळ पाणी पुरवठा योजनेच्या विभागाच्या वतीने रमेश घोलप यांनी सांगितले कि, या योजनेमध्ये काही चुकीचे झालेले नाही, शंका असल्यास चौकशी करण्यास हरकत नाही, असे सांगितले. दरम्यान या विभागाचे कनिष्ठ अभियंता मनीष पवार मासिक सभेस उपस्थित रहात नाहीत, यावरून अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान अमरसिंह यांनी तळवडे येथे फॉरेस्ट अथवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने खाजगी क्षेत्रात अतिक्रमण करीत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विशाळगड च्या पायथ्याला काही जणांनी अतिक्रमण केले असून, लोकांकडून अवैधरीत्या पैसे उकळले जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान विद्यमान आमदार विनयराव कोरे यांच्या मातोश्री शोभाताई कोरे यांचे निधन झाले,यास्तव सभागृहाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी उदयकुमार सरनाईक यांनी साळशी येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर ची राज्यातील ३०० आदर्श शाळांमध्ये प्राथमिक फेरीत निवड झाल्याचे सभागृहास सांगितले.

दरम्यान कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले कि, ज्या खातेदाराच्या नावावर सात बारा आहे, अशा शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एकास गोपीनाथ मुंडे विमा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी दोन लाख म्हणजे ४ लाख विमा मिळू शकतो. फक्त वेळेत याची नोंद होणे, गरजेचे आहे. दरम्यान मृत झालेल्या व्यक्तींचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट व अशा प्रकारची कागदपत्रे पोलीस ठाण्यातून वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असेही यावेळी कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी वाघमारे यांनी सांगितले केले कि, कोणतीही बिले अदा करण्याअगोदर त्यांच्या कामांचे फोटो सादर करण्यात यावेत. १५ व्या वित्त आयोगाची कामे बोर्ड लावूनच करावीत.
यावेळी सौ. स्नेहा जाधव, लता ताई पाटील रेठरेकर, अश्विनी पाटील, पांडुरंग पाटील आदी सदस्यांसह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.