बांबवडे त ” बळी तो कान पिळी ” अशी सामान्यांची अवस्था ?
बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील एसटी स्थानका जवळील गरीब भाजीविक्रेत्यांची जागा, सध्या वडाप आणि खासगी वाहनांनी काबीज केल्याचे निदर्शनास येत आहे. जर असे होते, तर भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना का हटविण्यात आले ? हा साधा प्रश्न जनतेच्या मनात उभा रहात आहे.
एकंदरीत इथल्या भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास बसू न देणाऱ्यांनी, हि जागा खासगी पार्किंग साठी किंवा वडाप पार्किंग साठी रिकामी केली का ? एकंदरीत इथला भाजीविक्रेता उठाविण्यामागे एसटी स्थानकासमोर होणारी गर्दी आणि होणारा चक्का जाम हटविण्याचे कारण होते.
यासाठी येथील एसटी कर्मचारी सुद्धा अधिकार नसताना, भाजी विक्रेत्यांना हटविण्यासाठी आघाडीवर असायचे, त्यांच्यासहित पोलीस कर्मचारी सुद्धा असायचे. ट्रॅफिक समस्या आजसुद्धा तितक्याच तीव्रतेने भेडसावत आहे. पण येथील खासगी वाहनांना मात्र कुणीही अडवत नाही. वडाप पार्किंग तर हक्काचे झाले आहे. यांना कोण का विरोध करीत नाही, कि भाजी विक्रेता शेतकरी आहे, त्याला कोण विचारणारे नाही, म्हणून हे सुरु होते का ? भाजी विक्रेत्यांना हटविण्यास दुमत नाही. पण त्यांची जागा वडाप वाले बळकावत असतील, तर हे योग्य नव्हे. दुसरे म्हणजे दुकानांच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर कोल्हापूर हून येणाऱ्या एसटी गाड्या या अगोदर थांबत होत्या, मग आता कुठे माशी शिंकली, कि एसटी वाले रस्त्यात उभे राहू लागले. आत्ता कोण एसटी कंट्रोलर का बाहेर येवून गाड्या हटवीत नाहीत.
एकंदरीत काय ‘ बळी तो कान पिळी ‘ अशी अवस्था येथील भाजी विक्रेत्यांची झाली आहे.