मला न्याय मिळेल काय ?-रुपाली गुरव : ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयाने गेली ११ महिने शव विच्छेदन अहवाल नातेवाईकांना दिलेला नाही. आणि याबद्दल उडवा-उडवी ची उत्तरे ग्रामीण रुग्णालयाकडून दिली जातात. यामुळे विधवा महिलेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. हा अहवाल त्वरित न दिल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा श्रीमती रुपाली रंगराव गुरव,यांच्यासोबत नातेवाईकांनी दिला आहे. मला न्याय मिळेल काय? अशी करुण साद देखील श्रीमती रुपाली रंगराव गुरव यांनी घातली आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत गोगवे चे सरपंच विकास पाटील व नातेवाईकांनी तहसील कार्यालायासाहित विविध शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे.

यावेळी गुरव कुटुंबाशी संपर्क साधला असता, असे सांगण्यात आले कि, ११ महिन्यापूर्वी निधन झालेल्या रंगराव गुरव यांचा शव विच्छेदन अहवाल दिला गेला नाही. याबाबत वारंवार विचारणा केली असता, सुरुवातील आज देवू, उद्या देवू असे सांगून टाळण्यात आले, तर त्यानंतर हा अहवाल गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. हि अक्षम्य चूक असून, हा मलकापूर ग्रामीण रुग्णालय इथं सावळा गोंधळ सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यांचा हा अहवाल न आल्याने विम्याची कागदांची पूर्तता थांबली आहे. विमा कंपनीने कागदपत्रांच्या अपूर्ण पूर्ततेचे कारण देवून विमा नाकारल्यास याची जबादारी कोण घेणार? हा महत्वाचा प्रश्न आहे. याला शासकीय अधिकारी या घटनेला पाठीशी घालत असून, याची त्वरित चौकशी व्हावी,व अहवाल मिळावा,असेही गुरव कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून, एका विधवा महिलेस न्याय मिळवून द्यावा, असा आग्रह सुद्धा कुटुंबियांकडून धरण्यात आला आहे.