विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
शाहुवाडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३० वी जयंती. या महामानवाने १३० वर्षांपूर्वी जन्म घेतला आणि भारताच्या तळागाळातील पिढीच्या उद्धाराला सुरुवात झाली. हे त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांना देखील कळले नसावे, कि या सुर्यपुत्राने अवघ्या पिडीत आणि शोषित पिढीला न्याय देण्यासाठी जन्म घेतला आहे. आज त्यांच्या क्रांतीनेच समानतेचा उच्चबिंदू गाठता आला. अशा या महामानवाला आणि क्रांतीच्या या सुर्यपुत्राला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने विनम्र अभिवादन.


आज भारतभूमीवर प्रत्येकाला मानाने वावरायला मिळते, अनेक क्षेत्रात आपलं कर्तुत्व दाखविण्याची संधी मिळते, ती केवळ या महामानवाने क्रांतीची ठिणगी पेटवली म्हणूनच. त्या ठिणगी चा वणवा भडकला. काही कर्मकांड करणाऱ्या मंडळींनी अवघा समाज आपल्या मगरमिठीत दाबून ठेवला होता. परंतु या विश्वरत्न ठरलेल्या महामानवाने या मगरमिठी ला सुरुंग लावला, आणि अवघा शोषित पिडीत समाज मगरमिठीतून बाहेर आला.

याच व्यक्तिमत्वाने संविधानात प्रत्येकाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि राज्य करणाऱ्या मंडळींना निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. आज या महामानवाची जयंती . एकीकडे कोरोना चा धुरळा उसळला असूनही, या महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनेक मंडळी शाहुवाडी पंचायत समिती च्या आवारात उपस्थित राहिलेली दिसली.

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव कामत व सहकारी मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजेच शाहुवाडी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे,सभापती विजयराव खोत यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून, अभिवादन केले. त्याचप्रमाणे गावडी चे ग्रामसेवक प्रमोद कांबळे यांनी सुद्धा या महामानवाला अभिवादन केले.